पुणे: चवीला रसाळ, आंबट-गोड असलेले फ्रान्समधील झिंगी सफरचंद पहिल्यांदा भारतात दाखल झाले आहे. मार्केट यार्डातील फळबाजारातील व्यापारी डी. बी. उरसळ अँड सन्स यांच्या गाळ्यावर रविवारी झिंगी सफरचंदाची आवक झाली. घाऊक बाजारात एक किलो झिंगी सफरचंदाला तीनशे ते साडेतीनशे किलो असा भाव मिळाला आहे.
फ्रान्समधील अंजोऊ भागात झिंगी सफरचंदाची लागवड इनटिस या फ्रेंच कंपनीने केली आहे. लाल रंगाचे झिंगी सफरचंद रसाळ आणि आंबटगोड आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात परदेशातील सफरचंदांची आवक वाढली आहे. फ्रान्समधील डाॅन लिमन आणि सायन ॲग्रीकोस या कंपनीने मार्केट यार्डातील फळबाजारातील डी. बी. उरसळ अँड ग्रँडसन्स या पेढीकडे झिंगी सफरचंद वितरणाची जबाबदारी सोपविली आहे. रविवारी (२२ ऑक्टोबर) उरसळ यांच्या गाळ्यावर ५०० किलो झिंगी सफरचंद दाखल झाली, असे डी. बी. उरसळ अँड ग्रँडसन्सचे रोहन उरसळ यांनी सांगितले.
किरकाेळ बाजारातील ग्राहकांसाठी झिंगी सफरचंदे प्लास्टिकच्या खोक्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्लास्टिकच्या एका खोक्यात सहा सफरचंदे आहेत. नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात झिंगी सफरचंदांची आवक नियमित सुरू होईल. मुंबईतील बंदरात जहाजाने झिंगी सफरचंदे येणार असून साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात २० ते २१ टन सफरचंदांची आवक फ्रान्समधून होईल. घाऊक बाजारात एक किलो झिंगी सफरचंदांना साधारणपणे ३०० ते ३५० रुपये किलो असा दर मिळाला आहे, असे उरसळ यांनी सांगितले.
आठ महिने परदेशातील सफरचंदांची आयात
न्यूझीलंडमधील सफरचंदे देशात विक्रीस पाठविण्यात येतात. फ्रान्समधील झिंगी सफरचंदे पहिल्यांदाच भारतात दाखल झाली आहेत. यंदा हिमाचल प्रदेश, काश्मीरमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे देशी सफरचंदांची लागवड, तसेच प्रतवारीवर परिणाम झाला आहे. इराणमधील सफरचंदांच्या तुलनेत फ्रान्समधील सफरचंदांची प्रतवारी चांगली आहे. देशी सफरचंदाची आवक यंदा कमी होणार असल्याने परदेशातील सफरचंदांची आयात वाढणार आहे, असे फळबाजारातील व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.