एक मतदारसंघ सांभाळताना किती नाकीनऊ येते, तुम्हाला काय सांगू, अशी अडचण आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका कामगारांच्या मेळाव्यात सांगितली आणि तुम्ही इतक्या संघटना कशा काय चालवता, असा प्रश्न महासंघाच्या अध्यक्षांना केला. सरकारी पतसंस्थांची अवस्था तशी वाईट असल्याचे दिसून येते. मात्र, पालिकेच्या पतसंस्थेने आर्थिक स्तर उंचावत नेला, ही कौतुकाची बाब आहे, असेही ते म्हणाले.
पिंपरी पालिका कर्मचारी महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. माजी महापौर संजोग वाघेरे, नगरसेवक महेश लांडगे, नितीन लांडगे, समीर मासूळकर, अनंत कोऱ्हाळे, विनायक गायकवाड, प्रभाकर वाघेरे, कैलास थोपटे, योगेश टिळेकर, नाना काटे, महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग म्हस्के, महाद्रंग वाघेरे, हनुमंत लांडगे, सुभाष सरीन, अंबर चिंचवडे, आबा गोरे, सुभाष माछरे, मनोज माछरे, शांताराम वाघेरे आदी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, पालिकेच्या उत्पन्नाला बाधा होईल, असे चित्र जेव्हा-जेव्हा निर्माण झाले. तेव्हा महासंघाने आक्रमक भूमिका घेतली. कर्मचाऱ्यांमध्ये हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव आहे. महासंघाचे काम चांगले आहे. आमदार म्हणून काम करताना एक मतदारसंघ सांभाळणे किती अवघड आहे, याची जाणीव होते. बबन झिंजुर्डे महासंघ व अन्य सलग्न संघटना इतकी वर्षे कशा सांभाळतात, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे त्यांचेच मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, असे ते म्हणाले. या निमित्ताने वैभव मांगले, भाऊ कदम यांची प्रमुख भूमिका असलेले ‘करून गेलो गाव.’ हे नाटक सादर करण्यात आले.

Story img Loader