पुणे महापालिकेच्या टिळक रस्ता, सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढवा-वानवडी, धनकवडी या चार क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या एका ठेकेदाराच्या सर्व कामांची चौकशी सुरू करण्यात आली असून या ठेकेदाराची काही कामे यापूर्वी तपासण्यात आली होती आणि त्यात अनेक गैरप्रकार आढळले होते.
या चार क्षेत्रीय कार्यालयांमधील दोनशेहून अधिक कामे एका ठेकेदाराने मिळवली असून त्यात मोठे गैरव्यवहार झाल्याचा आरोप महापालिकेच्या मुख्य सभेत करण्यात आला होता. या आरोपांनंतर संबंधित ठेकेदाराची कामांची तपासणी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केली होती. या ठेकेदाराने केलेल्या ३२ कामांची तपासणी केली असता त्यातील १२ कामांमध्ये अनियमितता आढळली होती. मिळालेल्या माहितीनुसार या ठेकेदाराने चार क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ४० कोटींची कामे मिळवली आहेत. या ठेकेदाराने केलेल्या कामांची तपासणी बकोरिया यांनी सुरू केल्यानंतर ५९ कामांच्या फाईल गायब झाल्याचे त्यांना आढळून आले. कामांमधील अनियमितता लक्षात आल्यानंतर या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश बकोरिया यांनी दिले होते. मात्र त्या आदेशांचेही पालन अधिकाऱ्यांनी केले नसल्याची माहिती समोर आली आहे. या ठेकेदाराच्या सर्व कामांची तपासणी बकोरिया यांनी सुरू केली आहे.
बकोरिया यांची महापालिकेतून क्रीडा व युवक कल्याण विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आल्यानंतर राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांनी या बदलीला तीव्र विरोध केला. त्यांची बदली केल्यास शहरात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे क्रीडा आयुक्त आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त या दोन्ही पदांवर बकोरिया काम पाहतील असा नवा आदेश शासनाने काढला.

Story img Loader