अभंग कसा असतो.. निदान कसा असायला हवा.. याचे काही आडाखे आपल्या मनात असतात. तो आर्त असतो, त्यात अभंगकर्ता विरघळून गेलेला असतो, वगैरे वगैरे.. हे असं असल्यामुळे अभंगकर्ता कोण, याचीदेखील आपल्या मनात एक आकृती तयार झालेली असते. परमेश्वरशरण वगैरे अशी.
या आकृतीवरनं आठवलं. ‘प्रभात’नं काढलेला ‘संत तुकाराम’ हा चित्रपट अनेकांना माहीत असेल. त्यात एक अभंग आहे- ‘आधी बीज एकले..’ असा. खूप गाजला तो. परंतु त्यामुळे तुकाराम अभ्यासक गोंधळले. त्यांना तुकारामाच्या वाङ्मयात तो कुठेच आढळेना. कसा आढळणार? तो तुकारामाचा नव्हताच. शांताराम आठवले यांनी लिहिलेला तो. इतका तुकारामाच्या व्यक्तिमत्त्वाशी तादात्म्य पावलेला अभंग होता तो, की अनेकांना तो तुकारामाचाच वाटला. हे असं होऊ शकलं, कारण अभंग आणि तो लिहिणाऱ्याचं व्यक्तिमत्त्व हे नातं अभंग होतं, म्हणून.
हे सांगायचं कारण म्हणजे- यामुळे रामदासांनी अभंगदेखील लिहिले असतील असं आपल्याला वाटतच नाही. रामदासांचा स्वभाव, भाषा सगळंच उग्र. त्यामुळे हा सद्गृहस्थ अभंगांच्या वाटय़ालाही गेला असेल हे जरा पचनी पडायला अंमळ वेळच लागतो. म्हणून आज रामदासांच्या अभंगांची ही ओळख..
हे अभंग रामदासांकडून विषयवार लिहिले गेलेत. म्हणजे विवेक, बंधन, भक्ती वगैरे असे. त्यांची धाटणी अभंगासारखीच आहे. पण तरी त्यात रामदासांचा म्हणून वेगळेपणा आहे. त्यांचं ते ठोस, ठाशीवपण या अभंगांतूनही दिसतं. आता आपण अभंग लिहितोय, म्हणून आपला रोखठोकपणा बाजूला ठेवू, असं काही रामदासांनी केलेलं नाही. त्याचे काही मासले..
‘डोळे चिरीव चांगले। वृद्धपणी सरक्या जाले।
वोले मातीचा भर्वसा। काय धरिती माणसा।।
मुख रसाळ चांगले। पुढे अवघे सुरकुतले।
रम्य नासिक सरळें। सर्वकाळ पाणी गळे।।
कर्ण भुषणी सुंदर। पुढे जाहले बधीर।
बरवी दंतांची पंगती। परि ते उन्मळोनि जाती।।
अंगकांती होती बरी। जाली चिरकुटाचे परी
गर्व तारुण्याचा गेला। प्राणी दीनरूप जाला।।
रामी रामदास म्हणे। आता सावधान होणे।।’
या अभंगांची गंमत म्हणजे नेहमीच्या धुमाळी ठेक्यावर ते गायचा प्रयत्न केला तर त्यांना आपोआप चालही लागते. गाताना ते अभंग असल्याची जाणीव होते. या अशाच प्रकारे रामदासांनी आपल्या अभंगांची रचना केलेली आहे. खास अभंगलेखन पद्धतीप्रमाणे या सर्व अभंगांचा शेवट ‘रामी रामदास म्हणे’, ‘दास म्हणे’ अशा रामदास-निदर्शक शब्दप्रयोगांनी झालाय.
‘वेल चालिला कोमल। त्यासी माया आले फल।
आदि अंती एक बीज। जाले सहजी सहज।
तयामध्ये बीज सार। थेट तृणाचा विचार।
मूळ तुटले बीज जळाले। होते जयांचे ते गेले।
सर्व संग परित्यागी। दास म्हणे महायोगी।।’
अभंगांच्या विषयसूचीत प्रस्तावना पंचक म्हणून एक प्रकार आहे. वर ज्या विषयांचा उल्लेख केलाय ते सगळे पंचक प्रकारातले आहेत. हा प्रकार अभंगांच्या छंदांवरनं झालाय. बारा ओव्याची शतके, अभंगांची पंचके, अष्टके अणि दशके, स्फुट ओव्या वगैरे अशा अनेक प्रकारांत रामदासांच्या अभंगांचं वर्गीकरण करता येईल. तुकारामासारख्या संताने लिहिलेल्या अभंगांचं संकलन असं आहे. म्हणजे तुकारामगाथा. रामदासांचं असं संकलन प्रसिद्ध नाही. पण ‘रामदासगाथा’ म्हणता येईल इतके अभंग त्यांनी लिहून ठेवलेत. ते लिहिताना आपल्या अन्य वाङ्मयाप्रमाणे रामदासांनी छंदबद्ध लिखाणाचेही काही प्रयोग केलेत. यात ओवी आहे, भुजंगप्रयातसारखं वृत्त आहे. अनुष्टुभ छंदही त्यांनी मोठय़ा प्रमाणावर हाताळलाय. खेरीज आरत्या, स्तोत्रं इथपासून ते कव्वाली, लावणी.. असं म्हणाल ते वाङ्मय रामदासांनी लिहून ठेवलंय. त्याचे विविध दाखले या स्तंभातून आपण अनुभवतोच आहोत. आणि हे छंद, वृत्त काही त्यांनी नुसतं आधारासाठी वापरलेलं नाही. त्याची तत्त्वं पूर्णपणे त्यांनी पाळलीयेत. म्हणजे अभंगांचं म्हणायचं तर त्यांची रचना बऱ्याच अंशी साखळीसारखी आहे. यात पहिल्या चार चरणांचा शेवट ज्या शब्दानं होतो त्यानेच पुढच्या चार चरणांची सुरुवात होते. याचा उपयोग केवळ सौंदर्यवृद्धीसाठी नाही. त्यामागे उपयुक्ततेचा विचार आहे.
तो असा की, त्याकाळी अभंग, ओव्या वगैरे पाठ करण्याची पद्धत होती. म्हणजेच आपली परंपरा ही मौखिक होती. गुरूनं लिहून ठेवलेलं शिष्यानं पाठ करून ठेवायचं आणि पुढे आपल्या शिष्याला ते द्यायचं. हे असं करायचं तर आपल्या रचनांची मांडणी सुलभ हवी. मुखोद्गत करायला सोपी अशी. ते तसं मुखोद्गत करायचं तर स्मरणशक्ती उत्तम हवी. नसेल, तर ती वाढवायला हवी. हा सगळा विचार या रचनांच्या मागे आहे. रामदासांच्या या पद्धतीत पाठांतर सोपं होतं. हवं तर करून बघा. मुक्तछंदात एखादी कविता पाठ असणं वेगळं आणि समग्र वाङ्मय डोक्यात बसलेलं असणं वेगळं. रामदासांच्या या रचना त्याच उद्देशाने पाठ करायला सोप्या आहेत. अशी काही उदाहरणं आता पाहू या..
‘आम्ही सावधान गावे। तुम्ही सावध ऐकावे।
सकळ सृष्टीचा गोसावी। त्याची वोळखी पुसावी।
स्वयें बोलिला सर्वेशु। ज्ञानेविणे। अवघे पशु।
दास म्हणे नाही ज्ञान। तया नरकी पतन।।’
दुसऱ्या अशाच एका पंचकातील हा एक अभंग बघा-
‘संतापले संतापले। संतापले मन संतापले।
झिज लागे झिज लागे। झिज लागे देहा झिज लागे।
सोसवेना सोसवेना। सोसवेना सीण सोसवेना।
धीर नाही धीर नाही। दास म्हणे अंतर पाही।’
या पंचकातले सगळेच्या सगळे अभंग या शैलीतले आहेत. म्हणजे शब्दांची पुनरुक्ती करत करत असा काही नाद त्यातून तयार होतो, की ते सहज लक्षात राहू शकतात.
हे करताना रामदास जे धक्के देतात, त्याचं आश्चर्य वाटतं. उदाहरणार्थ हा एक अभंग..
‘जे जे संसारासी आले। ते ते तितुके येकले।
वाया आपुली मानिली। सखी दुरी दुऱ्हावली।
सखी सांडुनिया देसी। मृत्यु पावला विदेसी।
खातां व्याघ्र आणि लांडगे। तेथे कैची जीवलगे।
घरी वाट पाहे राणी। आपण मेला समरांगणी।
रामी रामदास म्हणे। अवघी जाणावे पिसुणे।।’
या अभंगातली ‘घरी वाट पाहे राणी’ ही अगदी आजची वाटावी अशी ओळ. रामदासांचं हे वैशिष्टय़. त्यांचं वाङ्मय सदासर्वकाळ नित्य नवं वाटत राहतं. ते नव्यानं भेटतं. जुन्यातलं काही नव्यानं सापडतं. आणि म्हणूनच ते सदैव वाचनीय वाटतं.
समर्थ साधक – samarthasadhak@gmail.com