रामदासांच्या वाङ्मयातील सामाजिक आशय आणि त्याची प्रचलित काळातही असलेली विलक्षण उपयुक्तता समजावून सांगणारे आणि जाता जाता जमेल तितके ‘शहाणे करून सोडावे सकल जना’ या हेतूने योजलेले पाक्षिक सदर..

गत स्तंभात आपण देहाच्या सुदृढतेचे महत्त्व पाहिले. देह सुदृढ ठेवायचा, कारण तो तसा असेल तरच इतरांच्या कामी अधिक सक्षमतेने येऊ शकतो. देहाचा स्वार्थ साधायचा, कारण परमार्थ चांगल्या पद्धतीने साधता येतो. तेव्हा अशा तऱ्हेने नरदेह सांभाळायचा. अशा सांभाळलेल्या नरदेहाचा मग-
प्रपंच करावा नेमक। पहावा परमार्थ विवेक।
जेणेकरिता उभय लोक। संतुष्ट होती॥
म्हणजे प्रपंच उत्तम करायचा. उगाच आपले संसार, नमित्तिक कर्तव्य सोडून ‘देव देव’ करीत हिंडावयाचे नाही. उत्तम तऱ्हेने देहाचा प्रतिपाळ करावयाचा आणि त्यातला क्रियाशील काळ हा सत्कारणी लावावयाचा. तो कोणता? समर्थ सांगतात-
शत वरूषे वय नेमिले। त्यांत बाळंतपण नेणता गेले।
तारुण्य अवघे वेचले। विषयांकडे॥
खरी मेख आहे ती हे समजून घेण्यात. बाळपणी काहीच करता येत नाही. कारण देहाचा आणि बुद्धीचा विकास झालेला नसतो. तारुण्यात तो झालेला असतो, तर विविध विषयांची गोडी मनी उत्पन्न होऊन देह वैषयिकतेत रमतो. याची जाणीव होईपर्यंतच म्हातारपण येते. तेव्हा अशा तऱ्हेने सर्व करून करून भागलेला आणि आता काहीही न करता येणारा देह मग ‘देव देव’ करू लागतो. तेव्हा ही अध्यात्माची वा पारमाíथकाची कास काही स्वेच्छेने धरलेली असते असे नव्हे. परमार्थाची इच्छा वृद्धत्वात उचंबळून येते, कारण अन्य काही करता येत नाही म्हणून. तेव्हा हा काही खरा परमार्थ नाही. ज्याप्रमाणे आपणास उपयोग नाही म्हणून इतरांस दिलेल्या चीजवस्तूस दान म्हणता येत नाही, त्याप्रमाणे दुसरे काही जमत नाही म्हणून ‘देव देव’ करू लागलेल्याला पारमाíथक म्हणता येत नाही.
म्हणून शरीरात काही करावयाची धमक असतानाच इतरांचे भले करण्याची कास धरावयास हवी. परंतु तरुणपणी काही भले करायची इच्छा नसते. विवेक नसतो. आणि असलाच, तर तसे काही सत्कर्म करण्यास आळस आडवा येतो. म्हणून रामदास म्हणतात- आळस उदास नागवणा. तो टाळायला हवा. तो टाळून जेवढे काही साध्य करता येईल ते करावे. पण हे वाटते तितके सोपे नाही. याचे कारण रामदासांच्या मते, आळसाचे फळ रोकडे असते. दणकून जेवावे आणि हातपाय ताणून निद्रादेवीच्या अधीन व्हावे, यात जे काही सुख आहे ते अवर्णनीय. भल्याभल्यांना त्याचा मोह सुटत नाही. यासंदर्भात व्यवस्थापन महाविद्यालयांत शिकविले गेलेले एक उदाहरण येथे समयोचित ठरावे. वेळेचे व्यवस्थापन याचे महत्त्व शिकविताना अध्यापक म्हणाले होते- ‘प्रत्येकास एकदा आरामाची संधी मिळते. अभ्यास आदी उपाधींकडे दुर्लक्ष करून आधी आराम केल्यास आयुष्याच्या उत्तरार्धात कष्ट पडतील. तथापि आधी कष्ट केलेत, तर उत्तरार्ध अधिक चांगला आणि आरामदायी जाईल.’ समर्थ रामदास नेमके हेच सांगतात. कसे, ते पाहा..
आळसाचें फळ रोकडें। जांभया देऊन निद्रा पडे।
सुख म्हणोन आवडे। आळसी लोकां॥
साक्षेप करितां कष्टती। परंतु पुढें सुरवाडती।
खाती जेविती सुखी होती। येत्नेंकरूनी॥
आळस उदास नागवणा। आळस प्रेत्नबुडवणा।
आळसें करंटपणाच्या खुणा। प्रगट होती॥
म्हणौन आळस नसावा। तरीच पाविजे वैभवा।
अरत्रीं परत्रीं जीवा। समाधान॥
म्हणजे आळसाचा त्याग केल्यास आयुष्याच्या दोन्ही टप्प्यांवर अरत्री आणि परत्री समाधान प्राप्त होते. हा असा आळस टाकून झडझडून काम करणाऱ्या व्यक्ती ओळखायच्या कशा? त्यांची दिनचर्या असते तरी कशी? किंवा कशी असायला हवी?
प्रात:काळी उठावें। कांहीं पाठांतर करावे।
येथानशक्ती आठवावें। सर्वोत्तमासी॥
मग दिशेकडे जावें । जे कोणासिच नव्हे ठावें।
शौच्य आच्मन करावें। निर्मळ जळें॥
आता यातील दिशेकडे जाणेची गरज बहुतांस लागणार नाही. कारण बऱ्याच घरी आता स्वच्छतागृहे आली आहेत. परंतु त्यामागील मथितार्थ जाणून घेण्याची गरज आजही आहे.
कांहीं फळाहार घ्यावा। मग संसारधंदा करावा।
सुशब्दें राजी राखावा। सकळ लोक॥
अंघोळपांघोळ झाल्यावर फलाहार आदी घेऊन कामास लागावे. काम कोणतेही असो, सुशब्दे जनांस राजी राखणे कोणालाही अवघड नसते. किती साधी गोष्ट! रामदास म्हणतात-
पेरिले ते उगवते। बोलिल्यासारखे उत्तर येते।
मग कटू बोलणे। काय निमित्ये॥
म्हणजे तुम्ही जसे बोलाल तसे समोरून उत्तर येईल. मग कटू का बोलावे? तेव्हा अशा सुशब्दांनी आसपासच्या जनांना राजी राखून आपापल्या उद्योगास लागावे.
ज्या ज्याचा जो व्यापार। तेथें असावे खबर्दार।
असे रामदास सांगतात. अशी खबरदारी घेतली नाही तर हातोन चुका होतात आणि स्वत:वर चडफडून मनुष्याची मन:शांती नाहीशी होते. तेव्हा शरीराप्रमाणे बुद्धीचाही आळस दूर करून मनानेही सजग असावे.
चुके ठके विसरे सांडी। आठवण जालियां चर्फडी।
दुश्चित आळसाची रोकडी। प्रचित पाहा।।
अशा तऱ्हेने सर्वार्थाने सजग आणि सावधान का राहायचे?
याकारणें सावधान। येकाग्र असावें मन।
तरी मग जेवितां भोजन। गोड वाटे।
कारण अशा कष्टांतून व्यतित केलेला काळ कारणी लागतो आणि त्यातून अतीव समाधान लाभून अन्न गोड लागते. परंतु म्हणून गोड लागलेल्या अन्नावर ताव मारून नंतर हातपाय ताणून देऊन वामकुक्षी करावी असा विचार कोणी करीत असेल, तर तेदेखील योग्य नव्हे. ते का, रामदास सांगतात..
पुढें भोजन जालियांवरी। कांहीं वाची चर्चा करी।
येकांतीं जाऊन विवरी। नाना ग्रंथ ।
तरीच प्राणी शाहाणा होतो। नाहींतरी मूर्खचि राहातो।
लोक खाती आपण पाहातो। दैन्यवाणा।
किती सुलभपणे समर्थ आपणास शहाणे करून सोडतात, ते पाहा. चार घास खाऊन झाल्यावर ग्रंथांच्या सहवासात वेळ घालवून काही शहाणपण प्राप्त करून घ्यावे- असा त्यांचा सल्ला. ते न केल्यास माणूस मूर्ख राहतो आणि अशा मूर्खावर इतरांना मौज करताना पाहण्याची वेळ येते. म्हणून फालतू गॉसििपग आदी गोष्टींत वेळ घालवू नये.
ऐक सदेवपणाचें लक्षण। रिकामा जाऊं नेदी येक क्षण।
प्रपंचवेवसायाचें ज्ञान। बरें पाहे।
प्रपंच-व्यवसायाचे ज्ञान मिळवून उत्तमपणे ते कारणी लावावे. असे करून गाठीशी काही मिळवावे.
कांहीं मेळवी मग जेवी। गुंतल्या लोकांसउगवी।
शरीर कारणीं लावी। कांहीं तरी।
काही मूढ जनांस हे वाचून प्रश्न पडू शकेल की, हे सारे का करावयाचे? वा हे केल्याने काय होते? या प्रश्नांचे उत्तर समर्थ रामदासांनीच देऊन ठेवले आहे..
‘ऐसा जो सर्वसाधक। त्यास कैचा असेल खेद’ असे रामदास विचारतात. म्हणजे अशा पद्धतीने ज्याने आपले आयुष्य क्रियाशील कालात सत्कारणी लावले असेल त्यावर खेद करावयाची वेळ येत नाही. तो समाधान पावतो..
कर्म उपासना आणी ज्ञान। येणे राहे समाधान।
आयुष्यात अखेर दुसरे काय हवे असते?
समर्थ साधक – samarthsadhak@gmail.com