गेले दोन महिने आपण रामदासांच्या अपरिचित वाङ्मयाचा परिचय करून घेतला. रामदासांनी लिहिलेल्या लावण्या, त्यांचे दख्खनी उर्दूतील लिखाण वगरे.. आज याच मालिकेतील आणखी एक अप्रकट गोष्ट.
रामदास, रामचंद्र आणि हनुमान असे तिघांचे एक अद्वैत होते हे आता नव्याने सांगावे असे नाही. त्याचमुळे रामदासांच्या वाङ्मयात या दोघांचे दर्शन विविधांगांनी होते. याच्या बरोबरीने रामदासांनी त्यांच्या आवडत्या हनुमानासाठी स्वतंत्र मंदिरे बांधली. यातली गंमत बघा. समर्थ हे रामचंद्राचे भक्त. तो कोदंडधारी राम त्यांना सतत खुणावत असतो. परंतु रामदासांनी प्रभु रामचंद्रापेक्षा मंदिरे बांधली अधिक ती या रामचंद्राचा दास असलेल्या हनुमानाची. त्यांनी स्थापलेले ११ मारुती तर प्रसिद्धच आहेत. परंतु त्याखेरीजदेखील महाबळेश्वरपासून अनेक ठिकाणी रामदासांनी मारुतीची मंदिरे उभी केली. अशक्त, असत्व समाजाला स्फूर्ती देण्याची, शक्तीची जाणीव हा मारुतरायाच करू शकेल असे वाटल्यामुळेही असेल; परंतु रामदासांनी हनुमानास अनन्यसाधारण महत्त्व दिले. त्यांनी बांधलेली मंदिरे ही या महत्त्वाची भौतिक प्रतीके.
त्याखेरीज मारुतीविषयी अभौतिक अशी १४ शिल्पे रामदासांनी उभी केली. त्यातील एकच शब्दशिल्प अनेकांना ठाऊक असते. ते म्हणजे ‘भीमरूपी महारुद्रा..’ हे मारुतीस्तोत्र. आजही घराघरांत लहान मुलांना ते पाठ करून म्हणावयास लावण्याची परंपरा पाळली जाते. खरे तर या परंपरापालनाच्या नादात या श्लोकाचा आनंद काही घेता येत नाही, किंवा त्याकडे लक्षच जात नाही. किती सुंदर शब्दकळा आहे यातील! ‘वज्रहनुमानमारुती, गतीसी तुळणा नाही, आणुपासोनी ब्रह्मांडाएवढा..’ सारेच कसे त्या हनुमानाच्या आकारास साजेसे. पण ‘भीमरूपी’ हा काही आपला आजचा विषय नाही.
तर तो आहे अशी अन्य १३ हनुमानस्तोत्रे.
होय. ‘भीमरूपी’ हे एकमेव मारुतीस्तोत्र लिहून समर्थ रामदास थांबलेले नाहीत. त्यांनी याखेरीज अन्य १३ हनुमानस्तोत्रे लिहिली आहेत. त्यातील प्रत्येकाची शब्दकळा वेगळी आहे, हे सांगावयास नकोच. परंतु त्याचबरोबर प्रत्येकाचे वृत्तदेखील वेगवेगळे आहे. कसे, ते आपण आज पाहू या.
‘भीमरूपी’ हे स्तोत्र अनुष्टुभ वृत्तात आहे. या वृत्तात मोठय़ा आवाजात म्हणण्याची एक आगळी मजा असते. एक वेगळा ताल आपोआप धरला जातो. अचंबित करणारा भाग असा की रामदासांनी अन्य स्तोत्रांसाठीदेखील अशीच वृत्ते निवडली आहेत. प्रामाणिक, चामर, मालिनी आदी एरवी अपरिचित वृत्तांसाठी ही स्तोत्रे जरूर पहावीत. अलीकडच्या पिढीस मुळात वृत्त म्हणजे काय, हेच ठाऊक नसल्याने त्यांना हे प्रकरण कळणारे नाही. पण तरीही त्यांनी ते पहावे. याचे कारण विशिष्ट घाटात आपल्या प्रतिभेस वाट करून देणे आणि आपणास हवा तो पूर्वनियोजित आकार आपल्या कलाकृतीस देण्याच्या तंत्रावर हुकमत मिळवणे हे महत्त्वाचे असते. रचनेचे तंत्र कळल्यास प्रतिभेच्या मंत्राची परिणामकारकता वाढते याची जाणीव असावयास हवी. त्यादृष्टीने या अन्य मारुतीस्तोत्रांचा आनंद घेणे उपयुक्त ठरेल.
‘जनी ते अंजनी माता।
जन्मली ईश्वरी तनू।
तनू मनू तो पवनू।
एकची पाहता दिसे।।’
अशा श्लोकाने दुसऱ्या मारुतीस्तोत्राची सुरुवात होते. हे वृत्तदेखील ‘भीमरूपी..’सारखेच. मारुतीचे वर्णन करताना यात रामदास म्हणतात-
‘बाळाने गिळीला बाळू।
स्वभावे खेळता पहा।
आरक्त पीत वाटोळे।
देखले धरणीवरी।’
याचा वेगळा अर्थ सांगावयास नको, इतका तो स्पष्ट आहे. या मारुतीस्तोत्रात एकूण श्लोक आहेत ११.
तिसरे मारुतीस्तोत्र सहाच श्लोकांचे आहे.
‘कोपला रूद्र जे काळी।
ते काळी पहाविचेना।
बोलणे चालणे कैसे।
ब्रह्मकल्पांत मांडला।।’
या श्लोकाने नव्या मारुतीस्तोत्राची सुरुवात होते.
तिसरे मारुतीस्तोत्रदेखील ११ श्लोकांचे आहे.
‘अंजनीसुत प्रचंड, वज्रपुच्छ कालदंड।
शक्ति पाहता वितंड, दैत्य मारिले उदंड॥
चळचळीतसे लिळा, प्रचंड भीम आगळा।
उदंड वाढला असे, विराट धाकुटा दिसे॥’
काय रचना आहे! अगदी कवीकुलगुरूंनाही हेवा वाटावा.
चवथे स्तोत्र मोठे आहे. २४ श्लोकांचे. यात मारुतीच्या वर्णनावर रामदासांनी अनेक श्लोक खर्च केले आहेत.
‘हनुमंता रामदुता। वायुपुत्रा महाबला।
ब्रह्मचारी कपीनाथा। विश्वंभरा जगत्पते॥
धीर वीर कपि मोठा। मागे नव्हेचि सर्वथा।
उड्डाण अद्भुत ज्याचे। लंघिले समुद्राजळा॥’
असे हनुमानाचे वर्णनपर अनेक श्लोक यात आढळतात. अगदी लक्षात ठेवावे असे हे काव्य आहे.
पुढचे स्तोत्र मात्र अगदीच वेगळ्या वृत्तात आहे. याचेही ११ श्लोक आहेत.
‘कपि विर उठला तो वेग अद्भुत केला।
त्रिभुवनजनलोकी कीíतचा घोष केला।
रघुपति उपकारे दाटले थोर भारे।
परमवीर उदारे रक्षिले सौख्यकारे॥’
यातील श्लोक हे अशा चालीचे आहेत, की ते वाचताना करुणाष्टकांची आठवण यावी.
नंतरचे मारुतीस्तोत्र २० श्लोकांचे आहे. त्याचेही वृत्त वेगळे.
‘काळकूट ते त्रिकुट धुट धुट उठिले।
दाट थाट लाट लाट कुट कुट कुटिले।
घोरमार ते भुमार लुट लुट लुटिले।
चिíडलेची घíडलेची फुट फुट फुटले॥’
अशा पद्धतीची यातील रचना. ते वाचण्यात इतका आनंद आहे, की बास.
नंतरचे भीमरूपी स्तोत्र फक्त आठ श्लोकांचे आहे.
‘भुवनदहनकाळी काळ विक्राळ जैसा।
सकळ गिळीत उभा भासला भीम तसा॥’
ही याची सुरुवात. किती ताकदीची रचना आहे, पहा. मारुतीचे इतके यथार्थ वर्णन अन्य कोणाला सुचलेही नसते. यात एके ठिकाणी रामदास लिहितात-
‘थरकत धरणी हे हाणता वज्रपुच्छे
रगडित रणरंगी राक्षसे तृणतुच्छे..’
यानंतरच्या मारुतीस्तोत्रात तर फक्त तीन श्लोक आहेत.
‘लघुशी परि मुर्ती हे हाटकाची। करावी कथा मारुती नाटकाची..’ अशी त्याची सुरुवात. याचीही रचना पारंपरिक श्लोक पद्धतीची. म्हणजे म्हणावयाचे झाल्यास त्याच्या तालात आपोआप माना डुलाव्यात. या तुलनेत पुढील भीमरूपी स्तोत्र १० श्लोकांचे आहे. त्यात मारुतीचे वर्णन करताना रामदास लडिवाळ होतात.
‘चपळ ठाण विराजतसे बरे। परमसुंदर ते रूप साजरे..’ अशा हळुवार शब्दांत रामदास येथे मारुतीचे वर्णन करतात. ‘त्रिकुटाचळी, समिरात्मज..’ अशा पद्धतीची शब्दयोजना येथे आढळते.
पुढील मारुतीस्तोत्र मात्र चांगले २२ श्लोकांचे आहे. तेदेखील भीमरूपीइतकेच परिपूर्ण म्हणावे लागेल. त्याची सुरुवात सौम्य आहे आणि उत्तरोत्तर ते अधिकाधिक रौद्र होत जाते. त्यानंतरचे मारुतीस्तोत्र लहान आहे. बाराच श्लोकांचे. पण उग्र आहे.
‘भिम भयानक तो शिक लावी। भडकला सकळा भडकावी।
वरतरू वरता तडकावी। बळकटा सकळा धडकावी।’
असा याचा थाट.
यातील शेवटचे मारुतीस्तोत्र पुन्हा मध्यम आहे. दहाच श्लोकांचे.
‘बळे सर्व संहारिले रावणाला। दिले अक्षयी राज्य बीभीषणाला।
रघुनायका देव ते मुक्त केले। अयोध्यापुरा जावया सिद्ध झाले..’
अशी याची सुरुवात.
ही सर्वच स्तोत्रे वाचायलाच हवीत इतकी आनंददायी. अनेक अर्थानी. आपले ज्याच्यावर प्रेम असते त्याकडे किती नवनव्या नजरेने पाहता येते, हेदेखील यातून शिकण्यासारखे.
samarthsadhak@gmail.com