Pohe Meduwada Marathi Recipe Video: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या वेळी कडकडून भूक लागते. शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी व उष्णता निर्माण करण्यासाठी शरीर जास्त फॅट्स बर्न करत असल्याने ही भूक लागते असं म्हणतात. अशावेळी पटकन खायचं म्हणून, आपण टोस्ट, बटर, खारी- बिस्किटे असे सोपे पर्याय निवडतो पण त्यामुळे भूक काही वेळासाठी थांबत असली तरी मिटत नाही. अशावेळी आपले पारंपरिक पदार्थ अधिक पोषण व अधिक वेळ पोट भरल्याचा भास करून देतात. हे जरी खरं असलं तरी पारंपरिक पदार्थांना वेळ लागतो हे सुद्धा खरंय. आज आपण जगभरात प्रसिद्ध असा दक्षिण भारतीय ब्रेकफास्ट कसा बनवायचा हे पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे अवघ्या १० मिनिटात न आंबवता, न सोडा घालता इतकंच अगदी तेलही न वापरता आपण हे मेदुवडे कसे बनवायचे शिकणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्रामवर @cooking_with_Tripti या चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यामध्ये दिसणारे मेदुवडे हे खरंतर इडलीप्रमाणे वाफवलेले आहेत. आपल्याला हवे असेल तर आपण हे पीठाचे वडे तळून किंवा अगदी शॅलोफ्राय करून सुद्धा खाऊ शकता. लाल चटणी किंवा हिरवी चटणी या वड्यांसह कमाल लागते, तुम्हाला वेळ असल्यास झटकन डाळ- भाज्या मिक्स करून सांबार सुद्धा बनवू शकता. चला तर मग साहित्य व कृतीपाहूया ..

साहित्य

पोह्याचे मेदुवडे

1 कप पोहे
१/२ कप रवा
१/२ कप दही
चवीनुसार मीठ
कढीपत्ता
२ इंच आले
3 हिरव्या मिरच्या
२ चिरलेल्या सुक्या लाल मिरच्या
2 चमचे चिरलेली कोथिंबीर

चटणी साठी


1/4 कप भाजलेली चणाडाळ
1/4 कप भाजलेले शेंगदाणे
1/2 कप खोवलेले खोबरे
3 हिरव्या मिरच्या
१ इंच आले
चिंचेचा कोळ
चवीनुसार मीठ

फोडणीसाठी

1 टीस्पून तेल
1 टीस्पून मोहरी
1/4 टीस्पून हिंग
२ सुक्या लाल मिरच्या
कढीपत्ता

कृती:

१) मेदुवडे बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे १० मिनिट भिजवून मग त्यात रवा, दही, आलं, मिरची, कढीपत्ता, मीठ घालून मिक्सरला वाटून घ्या. वाटण एका भांड्यात काढून त्यात सुक्या लाल मिरचीचे बारीक तुकडे व कोथिंबीर घालून मिसळून घ्या. हे पीठ अगदी १० मिनिटं मुरण्यासाठी वेळ द्या तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया..

२) मिक्सरच्या भांड्यात खोबरं, चिंचेचा कोळ, मिरची, भाजलेली चणाडाळ व शेंगदाणे, आले व मिरची मिसळून वाटून घ्या. चटणी तुमच्या आवडीनुसार जाडसर किंवा पातक वाटून घ्या, मग याला फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये तेल, मोहरी,हिंग , २ सुक्या लाल मिरच्या व कढीपत्ता घालून तडतडून घ्या. ही फोडणी चटणीवर ओतून घ्या.

३) मेदुवड्याचे पीठ तयार असेल आपण आपल्या आवडीनुसार याला तळूही शकता, अन्यथा याला वड्याचा आकार देऊन मग इडलीच्या भांड्यात वाफवून घ्या. वडे करताना हाताला किंचित पाणी लावावे जेणेकरून वडे चिकटत नाहीत.

तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा!

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 mins recipe poha rava meduvada in marathi make idli wada batter without fermentation chutney sambhar quick recipe video svs