New Year party recipes: थर्टी फर्स्टच्या दिवशी पार्टीच्या मूडमध्ये सगळेचजण असतात. पण बाहेर खूप लोक गर्दी करतात म्हणून काहीजण बाहेर न जाता घरीच सेलिब्रेशन करतात. बाहेरून काही पदार्थ आणले काही घरी बनवले तर परफेक्ट बेत होतो. वर्षाच्या शेवटच्या दिवशी आम्ही तुमच्यासाठी खास चायनीज रेसिपीस घेऊन आलो आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चायनीज म्हणजे अनेकांचा आवडता पदार्थ. घरात जर स्पेशल जेवण बनवायचं असेल किंवा काही रोजच्या जेवणापेक्षा वेगळं खायचा बेत असेल तर आपल्या डोक्यात सर्वात प्रथम येतं ते म्हणजे चायनीज. पण चायनीज खायचं म्हटलं तर ते बाहेरुन ऑर्डर करणं याकडे अनेकांचा कल असतो. पण तसं नाही. बाजारातही चायनीज बनवण्यासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध आहे. त्यामुळे घरी चायनीज पदार्थ बनवून अस्सल हॉटेलचा स्वाद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात झटपट ३० मिनिटांत करता येतील असे चायनीज पदार्थ!

एग गार्लिक फ्राइड राईस :
फ्राइड राईस बनवताना एका कढईत तुम्ही कांद्याची पात आणि त्यात काही भाज्या घालून छान परतून घ्या. त्यात अंड्याचे मिश्रण घालावे. यानंतर चायनिज राईसचा स्वाद वाढवण्यासाठी यात सोया सॉस, लसूण, अद्रक आणि फ्राइड राईस मसाला टाकावा. व थोडा वेळ शिजवून घ्यावा. यानंतर यात शिजवलेला भात टाकून छान एकजीव करून घ्या आणि काही मिनिटं वाफ येऊन द्या. तर अश्या रीतीने गरमागरम आणि झटपट ‘एग गार्लिक फ्राइड राईस’ खाण्यासाठी तयार आहे!

फ्राइड चिकन चिली :
फ्राइड चिकन चिली म्हंटलं की प्रत्येकाच्या तोंडला पाणी सुटते. आणि फ्राइड चिकन चिली बनवायला देखील अगदी सोपी रेसिपी आहे. यासाठी चिकनचे बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यात सोया सॉस, टोमॅटो पेस्ट, लसूण पेस्ट आणि बाजारात व दुकानात सहज मिळणारा फ्राइड चिकन चिली मसाला घ्यावा आणि वरील सगळे मिश्रण तसेच मसाले एकत्रित करून काही वेळ मुरत ठेवणे. त्यानंतर कढईत तेल टाकून मुरत ठेवलेले चिकनचे तुकडे तळावेत. यानंतर दुसर्‍या कढईत तुमच्या गरजे नुसार तेल टाकून त्यात कांदा, गाजरचे बारीक तुकडे, बारीक उभी चिरलेली कोबी, कांदा टाकून चांगले परतून घ्यावे. त्यात चिकन चिली मसाला टाकावा. त्यात तळलेले चिकनचे तुकडे टाकावे व सर्व एकत्रित करावे. वरुन चवीनुसार मीठ घालावे. अश्या रीतीने काही वेळातच हॉटेल सारखी फ्राइड चिकन चिली खाण्यास तयार होईल.

चिकन मंचाव सूप :
पावसाळ्याच्या दिवसात भिजून आल्यानंतर गरम गरम सूप प्यायल्याने फ्रेश वाटते. यामुळे अनेकांना चटकदार चायनिज सूप पिण्याचा मोह आवरत नाही. अश्या वेळी झटपट तुम्ही चिकन मंचाव सूप बनवून चायनिज सूपचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. चिकन मंचाव सूप बनवण्यासाठी शिजवलेले चिकनचे तुकडे, लसूण, अद्रक चिली, गाजर, कोबी, फरसबी, तेल, पाणी, चिकन मंचाव सूप मसाला असे साहित्य घ्यावे. एका कढईत तुम्ही अगदी थोड तेल टाकून त्यात वरील सर्व भाज्या छान परतवून घ्या. त्यानंतर बाजारातून आणलेलं चिकन मंचाव सूपचं मिश्रण त्यात टाका आणि त्यात तुम्हाला हवं त्याप्रमाणे पाणी टाकून काही वेळ छान उकळी येउ द्या. अश्या रीतीने तुमच्या आवडी नुसार तुम्ही काही मिनिटातच गरमागरम चिकन मंचाव सूप तयार करू शकता.

चिकन चावमिन :
घरगुती चिकन चाऊमिन बनवणे आता अगदी सोपं असून अगदी सहजतेने बनविला जाऊ शकतो. सर्वात प्रथम तुम्ही एका बाऊलमध्ये चिकनचे तुकडे घेऊन त्यात सोया सॉस, अद्रक, लसूणची पेस्ट टाकून ते मॅरीनेट करावे. त्यानंतर हे मिश्रण तेलात हलके ब्राऊन होईपर्यंत तळावे. त्यात तुमच्या आवडीनुसार बारीक चिरलेल्या भाज्या, त्याचबरोबर गाजर, कोबी, कांदा, हिरवी, पिवळी किंवा लाल शिमला मिरची तुम्ही तुमच्या आवडी नुसार टाकू शकता. यात तुम्ही नूडल्स आणि अंडं टाकून अगदी ३० मिनिटांत ही डिश बनवू शकता.

चिकन लॉलिपॉप :
मांसाहार प्रिय असणार्‍यांना चिकन लॉलिपॉप आवडतो. आणि आता तुम्ही घरी देखील हॉटेल सारखा चवदार लॉलिपॉप बनवू शकता तेही ३० मिनिटांत. तुमच्या गरजेनुसार चिकन लॉलिपॉप घ्या. लॉलिपॉप मॅरिनेशन साठी एका बाऊलमध्ये आले लसणाची पेस्ट, सोया सॉस, काळी मिरे पावडर, व्हिनेगर आणि थोडे मीठ घालून एकत्र करून घ्यावे. आता लॉलिपॉपच्या बाहेरील आवरणासाठी एका भांड्यात कॉर्नफ्लोअर, मैदा, लाल मिरची पूड आणि थोडे मीठ घालून घ्यावे. एक अंडे फोडून घालावे. लॉलिपॉप मॅरीनेट झाल्यावर एका कढईत तेल घालून मध्यम आचेवर गरम होऊ द्यावे. लॉलिपॉप्स एकेक करून बॅटरमध्ये नीट घोळवून गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर ३-४ मिनिटे सोनेरी रंगावर तळून घ्यावे. गरमागरम तयार लॉलिपॉप तुम्ही शेझवान चटणी किंवा टोमॅटो केचअप सोबत वाढावे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 31 st party new year party 2024 celeration quick and easy chinese recipes you can rustle in 30 minutes scsm marathi recipe srk