Restaurant Style Chicken Recipes : ख्रिसमसनंतर अनेक लोक न्यू इयर पार्टीसाठी वेगवेगळे प्लॅन बनवत आहेत. या पार्टीत कॉकटेल, मॉकटेल आणि विविध प्रकारच्या ड्रिंक्ससह काही चटपटीत, क्रिस्पी पदार्थ आवडीने खाल्ले जातात. अशावेळी (31st December 2022) ड्रिंक्सबरोबर खाण्यासाठी लोक ऑनलाइन फूड अॅप्सद्वारे अनेक पदार्थ ऑर्डर्स करण्याचा विचार करतात. पण, यावेळी खूप ऑर्डर्स असल्याने एक तर तुमची फूड डिलिव्हरी पोहोचायला खूप वेळ लागतो, शिवाय जास्त पैसे आकारले जातात. त्यामुळे न्यू इयर पार्टीनिमित्त तुम्ही घरच्या घरी चविष्ट क्रिस्पी ‘हनी गार्लिक चिकन’ बनवू शकता. ही रेसिपी सोप्पी आणि पटकन तयार होते. चला तर मग जाणून घेऊ हनी गार्लिक चिकन रेसिपी कशी बनवायची.
हनी गार्लिक चिकन रेसिपीसाठी लागणारे साहित्य
१) अर्धा किलो चिकन
२) अर्धा कप मैदा
३) अर्धा कप कॉर्न फ्लोअर
४) एक चमचा सोया सॉस
५) ५० ग्रॅम मध
६) ८-१० लसूणच्या पाकळ्या
७) १ चमचा व्हिनेगर
८) काळी मिरी
९) २ चमचे ऑलिव्ह ऑईल किंवा बटर
हनी गार्लिक चिकन रेसिपी बनवण्याची कृती
सर्व प्रथम चिकन धुवून त्याचे मोठे तुकडे करा. आता त्यात मीठ आणि मिरपूड टाका आणि ती चिकनला चांगल्याप्रकारे लावा आणि अर्धा तास तसंच ठेवा. मीठ चिकनमध्ये सहज विरघळते आणि पाणी सोडते. यामुळे चिकन चांगल्याप्रकारे शिजण्यास मदत होते.
अर्ध्या तासानंतर चिकनला मैदा आणि कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणाने कोट करा. चिकन कोट करण्यासाठी एका प्लेटवर पिठाचे मिश्रण पसरवा. यानंतर चिकन कोट करा. पॅनमध्ये दोन ते अडीच चमचे बटर किंवा ऑलिव्ह ऑईल गरम करा, यानंतर त्यात चिकन घालून तीन ते चार मिनिटे शिजवा.
चिकन चांगल्याप्रकारे शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली लसूण टाका आणि चांगल्याप्रकारे शिजवा. यानंतर त्यात दीड चमचे व्हिनेगर आणि एक चमचा सोया सॉस घालून मिक्स करा. मंद आचेवर हे चांगल्याप्रकारे शिजू द्या. चिकन शिजत असताना त्यात मध घाला. आता मंद आचेवर चिकन दोन्ही बाजूने चांगल्याप्रकारे शिजवून घ्या. काही मिनिटांत टेस्टी हनी गार्लिक चिकन खाण्यासाठी तयार होईल. तुम्ही हे हिरव्या चटणीबरोबर किंवा असेच सर्व्ह करू शकता.