नेहमी घरच्या त्याच-त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी वेगळ्या प्रकारची भाजी खाण्याची इच्छा होते. अशा वेळी एकतर तुम्ही हॉटेलमधून काहीतरी वेगळी भाजी ऑर्डर करता किंवा यूट्यूब व्हिडीओ बघून घरी बनवण्याचा प्रयत्न करता. पण, अशाने एकच दिवस तुम्हाला चमचमित भाजी खाल्ल्याचा आनंद मिळतो. पण, आज आम्ही तुम्हाला अशी एक रेसिपी सांगणार आहोत, जिचा वापर करून तुम्ही घरीच महिनाभर हॉटेल स्टाईल वेगवेगळ्या भाज्या बनवू शकता. आज आपण महिनाभर टिकेल अशी हॉटेलमधील भाज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ग्रेव्ही कशी बनवतात हे पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊ रेसिपी…
ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य:
मगज बी – ५० ग्राम
काजू – ५० ग्राम
कांदे – पाऊण किलो
टोमॅटो – अर्धा किलो
तेल – ११ मोठे चमचे
तेजपान – ३-४
दालचिनी – १ इंच
हिरवी वेलची – ४-५
लवंग – ८-१०
मसाला वेलची – २
आले लसूण पेस्ट – ४ मोठे चमचे
हळद पावडर – १ छोटा चमचा
काश्मिरी लाल तिखट – २ मोठे चमचे
जिरे – २ छोटे चमचे
धने पावडर – २ छोटे चमचे
मीठ
कृती
सर्वप्रथम काजू आणि मगज बी कोमट पाण्यात २० ते २५ मिनिटे भिजत घाला. यानंतर कढईत तेल टाकून ते चांगले तापवा. त्यात मोठ्या पिसेसमध्ये कापलेला कांदा, थोडे मीठ घाला. कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्या. (कांदा जास्त तांबूस होईपर्यंत भाजू नका.) आता भाजलेला कांदा एका प्लेटमध्ये काढा. पुन्हा कढईत दोन चमचे तेल टाकून त्यात टोमॅटोचे तुकडे आणि लवकर शिजण्यासाठी थोडे मीठ घाला. ते शिजल्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्या.
यानंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात भाजलेला कांदा आणि थोडे थंड पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करा. (थंड पाण्यामुळे वाटण काळपट दिसत नाही.) अशाचप्रकारे भिजवलेला, काजू आणि मगज बियांची तसेच टोमॅटोची पेस्ट करा.
आता पुन्हा कढईत थोडे तेल तापवून त्या प्रमाणात घेतलेला तेजपत्ता, दालचिनी, इलायची, लवंग, मसाला, वेलची, जिरे टाकून चांगला सुगंध येईपर्यंत परतून घ्या. यात आलं लसूण पेस्ट टाकून चांगली परतून घ्या. आता त्यात कांद्याची पेस्ट काही सेकंद चांगली परता. यानंतर हळद, काश्मिरी लाल तिखट, धणे पावडर टाकून मिश्रण पुन्हा चांगले परतून घ्या. आता टोमॅटोची प्युरी टाकत झाकण ठेवा. ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत हे झाकण ठेवा. अधून-मधून ग्रेव्ही झाकण काढून परतत राहा, शेवटी मगज बी आणि काजूची पेस्ट टाकून पुन्हा ग्रेव्ही पाच मिनिटे परता. ही ग्रेव्ही जास्त आंबट झाली तर तुम्ही त्यात थोडी साखर टाकू शकता.
ही ग्रेव्ही तुम्ही कोणत्याही मसालेदार भाजीत टाकली तर एकदम हॉटेल स्टाईल भाजीची चव लागेल. अशाप्रकारे तुम्ही ही ग्रेव्ही फ्रिजरमध्ये महिनाभर ठेवून वापरू शकता.