सगळ्या गृहिणींसमोर एक प्रश्न नक्की सतावणारा असतो, तो म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं… अशात जर घरात लहान मुलं असतील, तर त्यांना आवडतील असेच पदार्थ बनवायला लागतात. पोहे, उपीट, खिचडी, इडली, डोसा या पदार्थांची कंटाळा आला असेल, तर आता ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे ती नक्की करून बघा. आपल्या मराठी घरांमध्ये थालीपीठ हा अगदी आवडीचा पदार्थ वारंवार बनवला जातो. विविध डाळींचं मिश्रण असलेली खमंग-खुसखुशीत भाजणी केली जाते आणि बारीक कांदा चिरलेला कांदा, कोथिंबीर असं सगळं एकत्रित करून थालीपीठ बनवणं अगदीच सोप जातं आणि आवडतंही.
पण तुम्हाला माहितीये का, याच भाजणीपासून आणखी एक मस्त पदार्थ बनवला जाऊ शकतो? आणि तुम्हाला थालीपीठाचा कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. ‘ खमंग मोकळ भाजणी’ असं या हटके पदार्थाचं नाव आहे. पोहे, उपीट खाऊन ज्यांना कंटाळा आलाय त्यांनी हा पदार्थ नक्की करून बघावा.
साहित्य
मिश्र कडधान्यांची भाजणी, हळद, तिखट, मीठ, धणेपूड, जीरेपूड, जीरे, तेल, हिंग, मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू, खोबरं, भाजणी ओलसर भिजवण्यासाठी पाणी.
कृती
सर्वप्रथम भाजणी घेऊन त्यात मीठ, तिखट, हळद, जीरेपूड, धणेपूड, हिंग घालून थोडेसे पाणी घालून मोकळी भिजवावी. त्यानंतर एका कढईत मंद आचेवर तेल गरम करून त्यावर मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता यांची खमंग फोडणी द्यावी. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा या फोडणीत खमंग परतावा. कांदा गुलाबीसर झाल्यावर त्यात मगाशी मोकळी भिजवलेली भाजणी घालावी व व्यवस्थित परतावी. यानंत भाजणीला पाण्याचा शिडकावा देऊन मंद आचेवर कढईवर झाकण ठेवून एक-दोन वाफ जाऊ द्यावी. नंतर झाकण काढून भाजणी ही मोकळ्या उपीटासारखी शिजली आहे का याचा अंदाज घ्यावा. भाजणी व्यवस्थित शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून त्यावर छानसं लिंबू पिळून आणि खोबरं-कोथिंबीर घालून खायला द्यावी.
मोकळ भाजणी ही चवीला खास लागतेच मात्र मऊ आणि खमंग असल्याने खायला वेगळीच मजा येते.
‘मोकळ भाजणी’ असं या हटके पदार्थाचं नाव आहे. पोहे, उपीट खाऊन ज्यांना कंटाळा आलाय त्यांनी हा पदार्थ नक्की करून बघावा.