अनेकदा तुम्ही म्हणताना ऐकले असेल की, “सुगरणीने पाण्याला फोडणी दिली तरी सगळ्यांनी मिटक्या मारत जेवले पाहिजे. ” किंवा “कुठल्याही पदार्थाचा आत्मा फोडणीत दडलेला असतो.” पण असे का म्हणतात बरं. कारण सोपं आहे, फोडणीमुळे कोणत्याही पदार्थाची चव वाढते. जेवण आणखी रुचकर होते. पण फोडणी देत असताना छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात घेतल्या तर तुम्हाला चांगला स्वयंपाक येतो असे समजले जाते. तुम्ही नव्याने स्वयंपाक शिकत असाल, हॉस्टेलवर किंवा रुमवर राहात असाल तर स्वयंपाक करताना कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना काय करावे आणि काय करू नये हे माहित असले पाहिजे.
फोडणी देताना कोणते भांडे वापरावे किंवा वापरू नये, भाजी, आमटी, कोशिंबीर करताना फोडणी कशी द्यायची हे जाणून घेऊ या…
१) फोडणी देतानाचे भांडे किंवा कढई शक्यतो जाड असले पाहिजे मग तुम्ही स्टीलची कढई वापरू शकता पण ती जाड आणि ठोक्याची कढई असावी. पातळ स्टीलची कढई वापरू नये कारण त्यामध्ये फोडणी करपते. पितळी कढई कलई करून वापरू शकता किंवा स्टीलमध्ये ट्राय प्लाय कढई वापरू शकतो ज्यामध्ये आत आणि बाहेर स्टीलचे आवरण असते आणि आतमध्ये अॅल्यूमिनिअम असते ज्यामुळे फोडणी करपत नाही, किंवा तुम्ही नॉनस्टीकचे भांडे वापरू शकता.
२) फोडणी देताना गॅस चालू करा आणि कढई ठेवा. गॅस मोठ्या आचेवर नाही तर कमी आचेवर ठेवा आणि भांड्यात लगेच तेल घाला. भांडे जास्त तापत ठेवायचे नाही. तेल टाकताच गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि तेल तापू द्या.
३) अनेकदा तेल थंड असतानाच मोहरी टाकतात, तसे करू नका. तेल तापल्याशिवाय मोहरी टाकू नका.
४) मोहरी टाकण्याआधी तेल तापले आहे की नाही ते पाहा त्यासाठी २-३ मोहरीचे दाणे टाकून पाहा, ती मोहरी तडकडली मग १ चमचा मोहरी टाका.
५) फोडणी देताना नेहमी आधी मोहरी टाका आणि मग जिरे टाका. जिरे आधी टाकल्यास ते करपते. म्हणून मोहरी चांगली तडकली की जिरे आणि बाकीचे जिन्नस टाका.
६) जिरे फुलले की मग लसून किंवा आले लसून पेस्ट जे काही आवश्यक आहे ते टाका आणि चांगले परतून घ्या. लसून परतल्यानंतर मग त्यात कडीपत्ता टाका. कडीपत्ता टाकल्यानंतर तडतड आवाज आला की फोडणी चांगली होत आहे.
७) जर फोडणीमध्ये मिरची टाकायची असेल तर कडीपत्ता टाकल्यानंतर तुम्ही मिरची टाकू शकता आणि चांगली परतून घ्या.
८) तुम्हाला फोडणीत कांदा घालायचा असेल तर मिरची परतल्यानंतर टाका आणि गुलाबी होईपर्यंत परता.
९) फोडणीत तुम्हाला टोमॅटो हवे असेल तर कांदा गुलाबी झाल्यानंतर फोडणीत टाकू शकता आणि चांगला परतून घ्या.
१०) कांदा टोमॅटो चांगले परतल्यानंतर मग त्यात पावडर मसाले घालावेत. प्रथम गॅस मंद आचेवर ठेवा आणि त्यात हिंग टाका, हळद किंवा तिखट घाला आणि चांगले परतून घ्या.
११) पावडर मसाले करपतात म्हणून गॅस बारीक केल्यावर कढई थोडी थंड होऊ शकते आणि फोडणी थंड होते पण भाजीला चरचरीत फोडणी बसत नाही म्हणून ५ ते ७ सेंकादासाठी गॅस मोठा करा आणि फोडणी परतून घ्या. विशेषतः पातळ भाजी करताना हे करायला विसरू नका.
१२ )आता त्यात तुम्ही कोणतीही भाजी असेल ती टाका आणि चांगले परतून घ्या. त्यात मीठ, मसाले किंवा दाण्याचा कुट, पाणी टाकून भाजी शिजायला ठेवा.
१३) कोशिंबीर, चटणी किंवा डाळीला वरून फोडणी देताना तूप किंवा बटर वापरत असाल तर गॅस एकदम कमी ठेवा कारण ते पटकन करपते आणि फोडणीची चव करपट होऊ शकते.
१४) डाळीला वरून तेलाची फोडणी देत असाल तर तडका डाळीत टाकली लगेच त्यावर झाकण ठेवा म्हणजे त्याची चव डाळीत उतरते.
१५) चटणी आणि कोशिंबीरला फोडणी देताना नेहमी फोडणी थंड होऊ द्या आणि मग त्यात टाका जेणेकरून चटणी आणि कोशिंबीरचा रंग बदलत नाही.
या टिप्स Sarita’s Kitchen नावाच्या युट्युबवर सांगितल्या आहेत.