Ayodhya Famous Food : जर तुम्ही राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभु रामाची नगरी अयोध्येत जाण्याचा विचार करत असाल तर तिथे गेल्यानंतर येथील प्रसिद्ध गोष्टींचा आनंद घ्यायला विसरू नका. अयोध्येत खाण्यापिण्याच्या अनेक फेमस गोष्टी आहेत, ज्या खाण्याचा मोह तुम्हालाही होऊ शकतो. यात अयोध्येतील चविष्ट गब्बर पकोडे खूप प्रसिद्ध आहेत, जे खाण्यासाठी खवय्यांची नेहमी रांग असते. त्यामुळे अयोध्येतील हे प्रसिद्ध गब्बर पकोडे घरच्या घरी कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहोत. जे अगदी चवीला एकदम बेस्ट आणि बनवायलाही तितकेच सोपे आहेत.
गब्बर पकोडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१) दोन मोठे चिरलेले बटाटे
२) दोन चिरलेले कांदे
३) एक वाटी बेसन
४) दोन चमचे तांदळाचे पीठ
५) एक कप बारीक चिरलेला कोबी
६) एक वाटी फ्लॉवर
७) एक वाटी वाटाणे
८) एक चमचा ओवा
९) दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१०) हिरवी कोथिंबीर
११) एक टीस्पून लाल तिखट
१२) मीठ चवीनुसार
कृती
गब्बर पकोडे बनवण्यासाठी सर्वप्रथम कोबी, फ्लॉवर, बटाटा (पालक, मेथी आवडीनुसार) स्वच्छ धुवून मग बारीक करून एका प्लेटमध्ये ठेवा. यानंतर फ्लॉवरचे बारीक बारीक तुकडे करून घ्या.
यानंतर चिरलेल्या सर्व भाज्या एका भांड्यात ठेवून चांगल्या मिक्स करा, आता त्यात आलं-लसूण, मिरची, हिरवी कोथिंबीर पेस्ट आणि थोडं लाल तिखट, मीठ टाकून पुन्हा मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. हे मिश्रण काही मिनिटे असचं झाकून ठेवा.
आता सर्व गोष्टी चांगल्याप्रकारे मिक्स झाल्या की, त्यात सुके बेसन आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा. तुम्ही पाणी वापरून हे पीठ मिश्रणात मिक्स करू शकता. मिश्रण अधिक घट्ट किंवा पातळ होऊ नये यासाठी तांदूळ आणि बेसनाचे पीठ समप्रमाणात घ्या.
यानंतर एका कढईत तेल चांगले गरम करा आणि तयार मिश्रणाचे छोटे, छोटे पकोडे कढईत सोडा. पकोडे दोन्ही बाजूने चांगल्याप्रकारे गोल्डन-ब्राउन होताच कढईतून काढा. अशाप्रकारे तुमचे अयोध्या स्पेशल गब्बर पकोडे खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही सॉस, चटणीबरोबर हे बब्बर पकोडे खाऊ शकता.