Bajra Atta Appe Recipe in marathi: नाश्याला काय करावं किंवा मुलांना आज डब्यात काय द्यावं, हा प्रश्न बहुसंख्य महिलांना रोज छळतो. कारण घरात प्रत्येकालाच काहीतरी वेगळं पाहिजे असतं शिवाय ते चवदारही असायला हवं. असं काहीतरी वेगळं करताना घरातल्या मंडळींच्या पोटाची, आरोग्याची काळजीही घ्यावीच लागते. म्हणूनच आता हा एक खास पदार्थ करून पाहा. भाकरी तर तुम्ही रोज किंवा वरचे वर खातच असाल पण कधी बाजरीच्या पिठाचे आप्पे खाल्ले आहेत का ? नाही ना मग ही भन्नाट रेसिपी नक्की ट्राय करा. लहान मुलांनाही आवडेल अशी बाजरीच्या पिठाचे आप्पे रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

बाजरीच्या पिठाचे आप्पे साहित्य

१ कप बाजरीचे पीठ

अर्धा कप रवा

अर्धी वाटी ताक

२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

१ टीस्पून आलं- लसूण पेस्ट

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

१ बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा

अर्धा टीस्पून बेकिंग सोडा

१ टीस्पून जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ

बाजरीच्या पिठाचे आप्पे कृती

सगळ्यात आधी एका भांड्यात बाजरीचे पीठ, रवा, ताक एकत्र करा आणि थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घ्या. एरवी डाळ- तांदूळाचे आप्पे करताना पीठ जेवढं घट्ट असतं, तसंच हे देखील पीठ भिजवावं.

आता भिजवलेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ, जिरे पूड घालून बारीक चिरलेला कांदा, आलं- लसूण पेस्ट, मिरच्या, कोथिंबीर घालावं.

आता हे पीठ फक्त ५ ते ७ मिनिटांसाठी झाकून ठेवा.

त्यानंतर या पिठामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग सोडा थोड्याशा पाण्यात कालवून घाला. पीठ एकदा हलवून घ्या आणि लगेचच आप्पे पात्राला तेल लावून गरमागरम आप्पे करा.

बाजरीचे आप्पे नेहमी मध्यम आचेवर करावे. जास्त खमंग आणि खुसखुशीत होतात.