जेवणात भात, डाळ, भाजी, चपाती आणि कोशिंबीर असेल तरी पोट भरल्यासारखं वाटतं. यातील कोशिंबीर आरोग्यासाठी चांगली असते. कोशिंबीरमुळे पोट भरते आणि आपण इतर पदार्थ कमी खातो. इतकेच नाही तर कोशिंबीरमधील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. म्हणून आहारात कोशिंबीर हवी असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. पण जेवणात कांदा, टॉमेटो, बीट, काकडी, मीठ, दही आणि मिरची घातलेली कोशिंबीर खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल ना? म्हणून तुमच्यासाठी लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातून कमीत कमी वेळेत तयार होणाऱ्या बिटाच्या कोशिंबीरीचे दोन प्रकार घेऊन आलो आहोत. बीट हे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते. यामुळे रक्तवाढीसोबतचं रक्तातील लोहाचं प्रमाणही वाढण्यास मदत होते, त्यामुळे रक्तवाढीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या बीटापासून कोशिंबीरीचे दोन वेगळे प्रकार कसे बनवायचे त्याचे साहित्य आणि कृती जाणून घेऊ…
आपण कोशिंबीरचा पहिला प्रकार हा उकडलेल्या बिटापासून करणार आहोत तर दुसरा कच्च्या बिटापासून करणार आहोत. दोन्ही प्रकारासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे…
साहित्य
५ ते ६ बीट, तूप, जिरे, ४-५ हिरव्या मिरच्या, मीठ, फोडणीसाठी जिरं, साखर चवीनुसार, लिंबू
उकडलेल्या बिटापासून कोशिंबीर बनवण्याची कृती
बीड उकडून साल काढून किसून घ्यावे. त्यात मिरचीचे बारीक तुकडे करुन घालावेत. तूप, जिऱ्याची फोडणी घालावी. चवीला मीठ व थोडे लिंबू पिळावे. या कोथिंबीरमध्ये साखर घालू नये. बीट गोड असते. त्यामुळे तिखट, आबंट अशी कोशिंबीर छान लागते.
कच्च्या बिटापासून कोशिंबीर बनवण्याची कृती
कच्च्या बिटाचे साल काढून ते किसावे, हिरवी मिरची बारीक चिरावी, एका भांड्यात किसलेले बीट घेऊन त्यात मिरच्या घालाव्यात. नंतर त्या चवीनुसार लिंबू रस, मीठ, साखर घालावी. त्यावर जिऱ्याची फोडणी घ्यावी. अशाप्रकारे तुमची बीट कोशिंबीर खाण्यासाठी तयार झाली.
दररोज एकाच प्रकारची कोशिंबीर खाऊन कंटाळला असाल तर बिटापासून तयार होणाऱ्या कोशिंबीरचे हे दोन प्रकार तुम्ही घरी नक्की ट्राय शकता. ही कोशिंबीर जास्त तिखट नसल्याने लहान मुलं देखील आवडीने खाऊ शकतात. नुसती कोशिंबीर खायला आवड नसेल तर तुम्ही पोळीसोबतही ही कोशिंबीर खाऊ शकता.