तुमच्यापैकी अनेकांच्या घरी सकाळच्या नाश्त्यात पोहे, उपमा, साबुदाणा वडे किंवा पराठे असे पदार्थ बनत असतील. बहुतेकांना यातील अनेक पदार्थ आवडतही असतील, पण वर्षानुवर्षे आपण तेच पदार्थ खात आलोय, त्यामुळे आज आपण हे पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या काही साहित्यांमधून सकाळच्या नाश्त्यासाठी एक वेगळा अन् हटके पदार्थ बनवणार आहोत, ज्याचे नाव आहे ‘पालक पोहे वडे.’ चवीला उत्तम असे हे वडे लहानांपासून मोठे सर्व जण आवडीने खातील, याशिवाय ते पौष्टिकदेखील आहेत.
जर तुमचे लहान मूल पालेभाज्या खाण्यास कंटाळा करत असेल, तर तुम्ही पालकऐवजी विविध पालेभाज्या वापरूनही असे वडे बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या पालक पोहे वडे कसे बनवायचे ते….
पालक पोहे वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१) २ वाटी पालक
२) १/२ वाटी साबुदाणा
३) १ वाटी पोहे
४) ४ हिरव्या मिरच्या
५) १ वाटी दही
६) १/२ कोथिंबीर
७) मीठ चवीनुसार
८) खाण्याचा सोडा गरजेनुसार (नाही टाकलात तरी चालेल)
पालक पोहे वडे बनवण्याची कृती
सर्वप्रथम साबुदाणे रात्री सात ते आठ तास चांगले भिजवत ठेवा. यानंतर सकाळी उठल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका, आता एका भांड्यात पोहे एक मिनिटे भिजवत ठेवा. यानंतर त्यातील पाणी काढून ते तसेच १० मिनिटे झाकून ठेवा. आता पालक निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. यानंतर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक कापून घ्या. आता भिजलेल्या पोह्यात पालक, चिरलेल्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर टाकून सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घ्या. मिश्रण एकजीव करताना हाताला थोडे तेल लावा, जेणे करून हाताला पीठ चिकटणार नाही. आता या सर्व मिश्रणात भिजलेले साबुदाणे चांगले मिक्स करा.
आता प्लास्टिकच्या कागदावर वडे थापून घ्या, यानंतर कढईतील चांगल्या गरम केलेल्या तेलात ते लालसर होईपर्यंत तळून घ्या. यानंतर तळलेले वडे एका डिशमध्ये काढून त्यावर दही घाला आणि त्यावर कोथिंबीर टाकून गार्निश करा, तुम्हाला दही नको असल्यास हिरव्या चटणीबरोबरही खाऊ शकता. इतकेच नाही तर सॉसबरोबरही ते चवीला उत्तम लागतात. असे झटपट पालक पोहे वडे तुम्ही रविवारी सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता.