Stuffed Eggplant Rolls Recipe: वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत, वांग्याचे काप यांची चव तर तुम्ही अनेकदा घेतली असेल. पण तेच तेच खाऊन तुम्हाला कंटाळा आलाय का? घरात वांगी आहेत पण यापेक्षा काहीतरी हटके, काहीतरी वेगळं करायचंय पण रेसिपीच सापडत नाहीय? तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. वांग्यापासून अतिशय खमंग, चवदार आणि झटपट होणारे भरलेल्या वांग्याचे रोल्स ही रेसिपी आपण आज जाणून घेणार आहोत.
साहित्य
१ वांगी (मोठी)
२ बटाटे (उकडलेले आणि मॅश केलेले)
४ चीज क्यूब्स (किसलेले)
मीठ (आवश्यकतेनुसार)
1 टीस्पून चिली फ्लेक्स
½ टीस्पून काळी मिरी पावडर
1 टीस्पून मिक्स्ड हर्ब्स
¼ कप कोथिंबीर (चिरलेली)
मीठ (आवश्यकतेनुसार)
लाल मिरची पावडर (आवश्यकतेनुसार)
१ टीस्पून तेल
पिठाची स्लरी (आवश्यकतेनुसार)
फ्रेश ब्रेडक्रंब्स (आवश्यकतेनुसार)
तेल (शॅलो फ्राईंगसाठी)
कृती
१. वांग्याचे स्टफ रोल करण्यासाठी भरताचं वांग घ्या. त्यानंतर या वांग्याचे पातळ काप करून घ्या.
२. वांग्याचे काप झाल्यानंतर ते मिठाच्या पाण्यात १० ते १५ मिनिटांसाठी मुरवण्यासाठी ठेवून द्या.
३. जोपर्यंत वांग्याचे काप मिठाच्या पाण्यात भिजतायत तोपर्यंत सारण तयार करून घ्या. यासाठी दोन मोठे बटाटे उकडून ते मॅश करून एका बाऊल मध्ये काढून घ्या. त्यात चीजचे ४ क्यूब्स किसून घाला व चवीनुसार मीठ घाला. त्यात १ टीस्पून चिली फ्लेक्स, ½ टीस्पून काळी मीरी पावडर, १ टीस्पून मिक्स हर्ब्स आणि पाव कप कोथिंबिर घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
४. आता पाण्यात भिजत ठेवलेले वांग्याचे काप काढा आणि त्याला मिठ आणि मसाला लावून घ्या. त्यानंतर गॅस सुरू करा आणि एका तव्यात तेल घालून काप दोन्ही बाजूने भाजून घ्या.
५. आता तयार केलेलं मिश्रण वांगाच्या कापांवर लावून त्याचे रोल्स तयार करून घ्या.
६. यानंतर मैद्यात पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा आणि याच्या मदतीने रोलचे शेवटचे टोक बंद करून घ्या. तसंच सगळ्या रोल्सला ब्रशच्या साहाय्याने पेस्ट लावून घ्या. नोट- रोल्स पेस्टमध्ये बुडवू नका अथवा ते जाड होतील आणि नीट तळले जाणार नाहीत.
७. आता हे रोल्स ब्रेड क्रंब्समध्ये घोळवून घ्या.
८. त्यानंतर तेल गरम करून रोल्स शॅलो फ्राय करून घ्या. दोन्ही बाजूने हे रोल्स खरपूस तळून घ्या.
अशाप्रकारे आपले गरमा-गरम कुरकुरीत वांग्याचे स्टफ रोल्स तयार झाले आहेत.
ही रेसिपी ‘रुचकर मेजवानी’ यांच्या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.