नीलेश लिमये

दक्षिण अफ्रिका म्हटल्यावर आठवतो तो ८०च्या दशकातला दमदार क्रिकेट संघ. त्यानंतर आठवते मलिबू रम. पण मला मात्र दक्षिण अफ्रिकेत गेल्यावर कोकणातच गेल्याचा भास होतो. एका बाजूला अथांग सागर, मागे डोंगर, आमराई आणि नारळाची बनं. आपल्या भारतातले काही लोक तिथे कैक वर्षांपूर्वी स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वयंपाकात दोन्हीकडच्या पद्धतींची सरमिसळ आहे. तिथेच स्थायिक झालेल्या सॅम्युअल रॉड्रिक्सच्या घरची ही अफ्रिकन भेंडीची भाजी. सॅम्युएलचे पणजोबा फ्रेंचांचे मजूर बनून अफ्रिकेत आले होते. त्यांना ही भाजी खाल्ल्यावर लहानपणाची आठवण व्हायची.

साहित्य

*   पाव किलो भेंडी, २ चमचे नारळाचे तेल, २ वाटी खोबरे, थाईम, ५-६ लसणाच्या पाकळ्या. आले, मीठ, मिरपूड, कोथिंबीर, २ टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कांदा.

कृती

एका पातेल्यात तेल गरम करा. चिरलेला कांदा आणि आले-लसूण वाटलेले त्यात घाला. त्यातच बारीक चिरलेली भेंडी घालून कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. यामध्ये वरून हिरवी मिरची घाला. चिरलेला टोमॅटोही त्यात घाला. सोबतच थाईमही घालून परतून घ्या. वरून खोबरे, कोथिंबीर घालून परत एकदा खरपूस परतून घ्या. थाईम आणि खोबऱ्याची चव जिभेला छान स्वाद देईल.