अमित सामंत amitssam9@gmail.com   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उडिसाची नवीन राजधानी भुवनेश्वर आणि जुनी राजधानी कटक ही दोन शहरे जवळजवळ आहेत. त्यामुळे या राज्यातील नवी-जुनी खाद्यसंस्कृती या शहरांत एकवटलेली आहे. भुवनेश्वर – कोणार्क-पुरी-चिल्का सरोवर ही या भागातील पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. पश्चिम किनाऱ्यावरील खाद्यसंस्कृतीत आणि पश्चिम बंगालमधील बंगाली बाबूंच्या खाद्यसंस्कृतीतील समान दुवा म्हणजे मासे आणि मिठाई.

जगन्नाथ पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक स्टॉल दिसतात. समुद्रावरचे ताजे फडफडणारे मासे तिथे हारीने मांडून ठेवलेले असतात. आपल्याला हवा तो मासा निवडायचा. मग तो विक्रेते मासा साफ करून आपल्याला मसाला फ्राय करून देतात. पुरीला लोक प्रथमावतारावर आनंदाने ताव मारताना दिसतात.

चिल्का हे आशियातले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवराकाठी असलेल्या हॉटेलात उत्तम मासे मिळतात. भुवनेश्वर-विशाखापट्टणम महामार्ग या सरोवराच्या बाजूने जातो. तिथल्या धाब्यांवरही या माशांचा आस्वाद घेता येतो.

रसगुल्ला उडिसात मोठय़ा प्रमाणावर खाल्ला जातो. पण छेना फोडा आणि छेना गाजा हे दोन पदार्थ ही उडिसाने गोड खाणाऱ्यांना दिलेली खास भेट आहे. दोन्ही पदार्थ पनीर म्हणजेच छेनापासून बनवले जातात, पण त्यांची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. छेना गाजामध्ये पनीर आणि रवा यांचे योग्य मिश्रण करून त्याचे आयताकृती छोटे तुकडे (गाजा) करतात, ते तळून रसगुल्लय़ासारखे साखरेच्या पाकात बुडवतात. छेना पोडा हा केकसारखा दिसणारा पदार्थ आहे. पनीर, रवा, साखर किंवा गूळ यांचे योग्य मिश्रण करून ते शिजवतात. छेना फोडा हा पदार्थ आता सगळ्या मोठय़ा शहरांत मिळतो. पण छेना गाजाने अजून उडीसाच्या सीमा ओलंडलेल्या नाहीत. भुवनेश्वर आणि कटकमध्ये हे दोन्ही पदार्थ मिळणारी अनेक दुकाने आहेत. उडीसाला जायची संधी मिळाली तर छेना फोडा आणि छेना गाजा या दोन पदार्थाचा आणि ताज्या माशांचा आस्वाद नक्की घ्या.

 

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhena poda recipe of odisha