रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते.नॉनव्हेज आवडणाऱ्या लोकांना चिकनसारखे विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, टेस्टी चिकन रोल अगदी रोड साईड किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळतो तसा, चला तर मग पाहुयात कसा बनवायचा टेस्टी चिकन काठी रोल.
चिकन काठी रोल साहित्य –
- गव्हाचे पीठ दीड वाटी, ड्राय यीस्ट १ चमचा
- साखर अर्धा चमचा, चिकन खिमा दीड वाटी
- कांदा बारीक चिरून अर्धी वाटी
- सिमला मिरची बारीक चिरून अर्धी वाटी
- हिरवी मिरची चिरून २, लसूण चिरून ४ पाकळ्या
- कोथिंबीर चिरून अर्धी वाटी
- तेल २ चमचे, मीठ चवीनुसार
चिकन काठी रोल कृती –
४ चमचे कोमट पाण्यात अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, यीस्ट घालून १५- २० मिनिटे झाकून ठेवा. नंतर कणकेमध्ये यीस्ट मिसळून भिजवून ठेवा. दीड ते दोन तासांनी पीठ व्यवस्थित फुगेल. त्याच्या ५ पोळ्या, पातळसर लाटून भाजून घ्याव्यात. चिकनचे स्टफिंग करण्यासाठी पॅनमधील तेलात कांदा, हिरवी मिरची, परतून घ्या. गुलाबी रंग आल्यावर, सिमला मिरची परतून घ्या. लसूण घाला. चिकन खिमा घाला. तोही परता. ३-४ मिनिटे परतून कडेने तेल सुटायला लागल्यावर मीठ घाला. ढवळून गॅसबंद करून, कोथिंबीर घालून ढवळा. काठी रोल वाढताना, पोळीमध्ये चिकनचे स्टफिंग भरून रोल करून वाढा.
हेही वाचा – Paplet fry: केळीच्या पानातील पापलेट फ्राय; एकदा नक्की ट्राय करा
सजावटीसाठी सिमला मिरची आणि कांद्याच्या चकत्या वापरा. चटपटीतपणा वाढवायचा असेल तर, रोलमध्ये स्टफिंग भरण्याआधी पुदिन्याची चटणी/टोमॅटो सॉस पोळीला लावू शकता. खमंग, पौष्टिक, चविष्ट पण कमीतकमी तेल वापरून केलेले काठी रोल नक्की करून बघा. चिकनमुळे भरपूर प्रोटीन्स आणि भाज्यांमुळे व्हिटामिन, मिनरल्स मिळतात. यीस्टमधून व्हिटामिन ई मिळतं.