एप्रिल आणि मे महिना म्हणजे लग्न सराईचा काळ. मे महिन्यात लग्नाचे खूप मुहूर्त असल्याने या महिन्यात सगळ्यात जास्त लग्नाचे बार उडतात.लग्नात नवरीच्या रूखवतावर ठेवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. खास करुन गोड धोड पदार्थ केले जातात. अशातच शिदोरी भरून ठेवण्यासाठी तर वेगवेगळया आकारातील चिरोटे केले जातात. चिरोटे दोन प्रकारे करता येतात. साध्या किंवा पाकातले अशा दोन पद्धतीने केले जातात. चला तर पाहुयात गोडाचे चिरोटे कसे करायचे.
चिरोटे साहित्य –
- मैदा १ वाटी, मीठ चिमूटभर
- दोन चमचे तूप, पाव चमचा बेकिंग पावडर
- थोडा गुलाबी रंग, साखर अर्धी वाटी
- कॉर्नफ्लोवर पाव वाटी
चिरोटे कृती –
मैदा, मीठ, बेकिंग पावडर व तुपाचे मिश्रण एकत्र करा. दुधात पीठ भिजवून ठेवा. त्या पिठाचे तीन भाग करा, रंग मिसळा. तूप फेटून त्यात कॉर्नफ्लोअर घालून मिक्स करा. मिश्रणाचा किंचितसा साटा पाण्यात टाकून बघा तो पाण्यावर तरंगायला हवा. पिठाच्या तीन पोळ्या लाटून घ्या. पिठी वापरून पातळ लाटा. एका पोळीवर साटा पसरवा. त्यावर रंगीत पोळी ठेवून त्यावरही साटा पसरवा. पुन्हा पांढरी पोळी ठेवा आणि त्यावरही साटा लावा. त्याची गुंडाळी करा. ओल्या कपड्याखाली झाकून ठेवा. नंतर त्याचे अर्धा इंचाचे तुकडे कापून घ्या. कापलेली बाजू वर करून अलगद हाताने थोड्या पिठीवर चिरोटा लाटा.
नंतर कढईत तूप तपले की, त्यात एकेक चिरोटा घाला. कढईत टाकल्याबरोबर जरा खाली दाबा. तळल्यावर अगदी गुलाबाच्या फुलासारखा दिसतो. सर्व चिरोटे तळून झाले की, त्यावर पिठी साखर भुरभरा. किंवा थोड्या साखरेचा पक्का पाक करून घ्या. प्रत्येक चिरोट्यावर थोडा थोडा घाला. गार्निशिंगसाठी त्यावर बदाम-पिस्त्याचे काप टाका.
हेही वाचा – Summer special: उन्हाळ्यात करा चटपटीत कैरीचे सार, जाणून घ्या सोपी रेसिपी
हे चिरोटे लग्नातील रुकवतासाठी नक्की करुन बघा, आणि कसे होतात ते आम्हाला कळवा.