– शुभा प्रभू-साटम
सारस्वत समाजात पुरणपोळी खोबऱ्याची करतात.
साहित्य
ओलं खोबरं २ मध्यम वाटय़ा (मिक्सरवर थोडेसे गुळगुळीत करून घ्या.), गूळ १ वाटी किसून, वेलची, जायफळ, कणीक, मदा अथवा पूर्ण कणीक आवडीप्रमाणे घ्या ३ मोठय़ा वाटय़ा, तूप.
कृती
मोदकासाठी जसे सारण करतो तसेच करायचे, खोबऱ्यात गूळ, वेलची, जायफळ घालून झाकून ठेवा. यात खसखस घालायची नाही. पोळी फुटू शकते. तोपर्यंत मदा, कणीक सम प्रमाणात घेऊन व्यवस्थित पीठ भिजवून घ्या, जाड बुडाच्या पातेल्यात खोबरं, गूळ पाचेक मिनिटे शिजवा. फार कोरडे होता नये. पाणी सुकले पाहिजे. खोबरं थोडंसं वाटल्यामुळे पोळी लाटणं सोपं जातं. सारण गार होऊ द्या. पिठाची खोलगट वाटी/पारी करून त्यात हे सारण भरा. तोंड बंद करून घ्या. तवा तापवून घ्या. पोळपाटाला तूप/तेल लावून हलक्या हाताने पोळी लाटा. फार पातळ करायची गरज नाही. तव्यावर तूप सोडून मंद आगीवर खमंग भाजा. एक पोळी प्रथम करून पाहा. जर लाटता येत नसेल तर सारण मिक्सरमधून परत फिरवा.