अद्वय सरदेसाई
साहित्य
* १ चमचा लिंबाचा रसा, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, १ चमचा तेल, लसणीच्या ७-८ पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, पाव कप कांदा चिरलेला, पाव कप कोबी चिरलेली, पाव कप गाजर चिरलेले, ३ कप व्हेजिटेबल स्टॉक, २ चमचे मक्याचे पीठ, चवीसाठी मीठ
कृती– व्हेजिटेबल स्टॉक म्हणजे भाज्यांचा अर्क उतरलेले पाणी. सूप्समध्ये साधे पाणी घातल्यास अनेकदा त्यातील घटक पदार्थाची चव उतरते. पण व्हेज स्टॉक घातल्यावर मात्र ती अधिक खुलते. त्यासाठी २ मोठे कांदे, २ मोठी गाजरं, ३ सेलरीच्या काडय़ा, लसणीच्या वाटीभर पाकळ्या, १०मिरीदाणे, १ तमालपत्र घ्या. आता कांदा, गाजर, सेलरी चिरून घ्या. लसूण ठेचून घ्या. आणि सर्व पदार्थ एका भांडय़ात घाला. त्यात पाणी ओता आणि मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा. याला चांगली दणदणीत उकळी आली की गॅस बंद करा. गार झाल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या. हा झाला तयार व्हेज स्टॉक.
आता वळूया मूळ सुपाकडे. एका भांडय़ात तेल घालून मिरची आणि लसूण परतून घ्या. यातच अर्धी कोथिंबीर घाला. त्यात कांदा घालून परता. मग गाजर आणि कोबी घालूनही परता. ते मऊ झाल्यावर त्यात व्हेज स्टॉक, लिंबूरस, मीठ घाला. मक्याचे पीठ थोडय़ाशा पाण्यात कालवून घ्या. सूपला दाटपणा येण्यासाठी ही पेस्ट त्यात घाला. उकळी आल्यावर गॅस बंद करा. वरून उरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम प्या.