Cucumber Idli Recipe In Marathi: एप्रिल महिन्याला सुरुवात झाल्यापासून वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्यामध्ये गरम-तिखट पदार्थ खाल्याने पोटात जळजळ होण्याची शक्यता असते. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावते असेही म्हटले जाते. गरम वातावरणामध्ये अशा पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर असते, ज्यांच्यामुळे पोट थंड राहील. उन्हाळ्यात काकडी मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. कोशिंबीर, सलादमध्ये काकडीचा समावेश केला जातो. काकडी थंड असल्याने तिच्या सेवनामुळे पोट थंड व शांत राहण्यास मदत होते. हेल्थ कॉन्शियस लोक नेहमी काकडी खात असतात.
कोशिंबीर, सलाद व्यतिरिक्त काकडीची इडली देखील बनवता येते. हा पदार्थ नाश्त्याला खाल्ला जातो. काकडीला कूलिंग चव असल्याने मसालेदार चटणी सोबत जोडून पौष्टिक नाश्ता करता येतो. हा पदार्थ कोकण आणि कर्नाटकमधील काही भागांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. याला ‘कदंब’ असेही म्हटले जाते. वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड असणाऱ्या खवय्यांसाठी या थोड्याश्या वेगळ्या पदार्थाची सोपी रेसिपी आम्ही लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेऊन आलो आहोत.
साहित्य :
- एक वाटी इडली रवा
- दोन वाट्या जाड पिवळी काकडी
- अर्धी वाटी ओल खोबरं (शहाळे मिळाल्यास उत्तम)
- थोडीशी साखर (ऐच्छिक)
- राई
- उडीद डाळ
- कढीपत्ता
- किंचित मीठ
- हळदीची किंवा केळीचा पाने
- फोडणीसाठी तेल
कृती :
- इडली रवा अर्धा तास भिजवा आणि त्यामध्ये किसलेली काकडी, खोबरं, मीठ घाला.
- सर्व पदार्थ एकत्र करुन त्यात अर्ध्या-पाऊण तासासाठी कालवून ठेवा. ते मिश्रण इडलीच्या पिठासारखे असायला हवे.
- काकडीच्या पाण्यात आणि खोबऱ्यात रवा छान भिजतो. त्यात फोडणी करुन ओता.
- केळीची/ हळदीची पाने असल्यास त्याचे द्रोण करा. ते शक्य नसल्यास इडलीच्या पात्रात पाने ठेवून त्यावर रवा, काकडीचे मिश्रण घाला.
- ७ ते १० मिनिटे वाफवा. पुढे हिरवी चटणी किंवा हिंग उदाक (हिंगाचे सार) यासह सर्व्ह करा.
(इडली तयार करताना त्यांचा आकार बिघडला तरी चालेल, पण त्याला पानांची चव लागणे महत्त्वाचे असते.)