Dal vada recipe in marathi: आपल्याकडे पोहे, उपमा असे काही पदार्थ नाश्ता म्हणून खाल्ले जातात. इडली-वडा, डोसा सकाळी खाणं पसंत केलं जात. पण संध्याकाळच्या नाश्त्याबाबत फारसं कोणी बोलत नाही. काम उरकल्यावर संध्याकाळी चहाबरोबर एखादा कुरकुरीत पदार्थ मिळाला तर दिवस सार्थकी लागल्यासारखा होतो. अशात परिस्थितीमध्ये दक्षिण भारतातला डाळ वडा चांगला पर्याय ठरु शकतो. या डाळ वड्याला दक्षिणेमध्ये ‘पारिप्पू वडा’ असे म्हटले जाते. शरीरासाठी आवश्यक असलेले प्रोटीन्सने परिपूर्ण असलेल्या डाळींपासून बनवला जाणारा हा पदार्थ आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. डाळ वडा घरच्या घरी देखील बनवता येतो. आम्ही तुमच्यासाठी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील डाळ वडा/पारिप्पू वडा या पदार्थाची सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत.
साहित्य:
- वाटाण्याची डाळ १ कप
- पाव कप हरभरा डाळ
- ४ हिरव्या मिरच्या
- ४ सुक्या लाल मिरच्या
- १० लहान कांदे
- १०-१२ कढीपत्त्याची पाने
- पाव चमचा हिंग
- १ चमचा मीठ
- आल्याचा १ छोटा तुकडा
- तळण्यासाठी खोबरेल तेलाच्या २ वाट्या
कृती:
- दोन्ही डाळी दोन तास भिजवा. त्यानंतर त्यामध्ये आलं, मिरच्या, कढीपत्ता, लहान कांदे घाला.
- एकूण मिश्रण जाडसर होईपर्यंत वाटून घ्या.
- वाटलेल्या या मिश्रणामध्ये हिंग आणि मीठ घाला आणि ते नीट एकत्र करुन घ्या.
- पिठाचा लहानसा गोळा घेऊन तळहातावर थोडा दाब देऊन वडे तयार करा.
- कढईमध्ये तेल तापत ठेवा. तेल गरम झाल्यावर वडे सोनेरी रंग होईपर्यंत तळा.
दावणगिरी ज्वारी डोश्याने दिवस करा सुरु; डायबिटीज रुग्णांसाठी तर बेस्टच! पाहा झटपट रेसिपी
डाळ वडा प्रामुख्याने खोबऱ्याच्या चटणीसह खाल्ला जातो. तुम्ही हा पदार्थ केचअप किंवा सॉसबरोबर देखील खाऊ शकता. याशिवाय चहा आणि डाळवडा हे समीकरणही ट्राय करु शकता. ही रेसिपी वाचून घरच्या घरी डाळ वडा बनवा आणि आम्हाला नक्की कळवा.