खिचडी….कोणाची आवडती असू शकते का? पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात अशी अनेक राज्ये आहेत जिथे खिचडी अगदी आवडीने खाल्ली जाते. बिहार, आंध्र प्रदेश, आसाम या राज्यांमध्ये खिचडी खूप लोकप्रिय आहे आणि खिचडी अनेक प्रकारांमध्ये तयार केली जाते. अशाच एका खिचडीचा प्रकार आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर पाहुयात दलिया खिचडी कशी बनवायची.
दलिया खिचडी साहित्य –
- १ वाटी दलिया (भरडलेला गहू), अर्धी वाटी मूगडाळ,
- १ छोटा कांदा बारीक चिरलेला, १ छोटा टोमॅटो बारीक चिरलेला
- १ मध्यम आकाराची बारीक चिरलेली ढोबळी मिरची
- १ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले गाजर, पाव वाटी मटार
- पाव चमचा आलं-लसूण पेस्ट, १ चिमूट हिंग, पाव चमचा हळद
- पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, २ लवंगा, २ मिरे
- १ छोटा तुकडा दालचिनी, पाव चमचा लाल तिखट
- मीठ चवीनुसार, २ मोठे चमचे तेल
- किसलेले खोबरे आणि सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर.
दलिया खिचडी कृती –
दलिया आणि मूगडाळ स्वच्छ धुऊन अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. प्रेशर कुकरमध्ये गरम तेलात मोहरी, जिरे, लवंगा, मिरे, दालचिनीची फोडणी करून कांदा गुलाबी रंगावर परता. त्यात आलं-लसूण पेस्ट आणि वरील सर्व बारीक चिरलेल्या भाज्या परतून एक वाफ आणा. वरील मिश्रणात भिजवलेले दलिया आणि मूगडाळ, हळद आणि लाल तिखट टाकून परतून घ्या. त्यात २ ते अडीच वाटी पाणी घालून झाकण लावा. तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस ५ मिनिटे मंद आचेवर ठेवा.
हेही वाचा – ग्रीन पुलाव! चटपटीत ही घ्या झटपट होणारी झणझणीत, खमंग रेसीपी
तयार खिचडी, किसलेले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाढा.