Moong Dhokala Recipe In Marathi: निरोगी राहण्यासाठी पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण किंवा आपली आई नेहमीच त्या शोधात असतो. आणि अशात जर पौष्टिकतेसोबत टेस्टही मिळाली तर वाहहह अजून काय हवं. आहारात जेव्हा आपण पौष्टिकत शोधतो तेव्हा आपण सर्वात आधी कडधान्य आणि डाळींचा पर्याय निवडतो. आहारात अनेक डाळींचा समावेश करतो. या डाळींचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये तुरडाळ, चणा डाळ, मसूर डाळ यातही मूग डाळ ही सर्वात आरोग्यदायी मानली जाते. आतापर्यंत आपण मूगडाळीची भजी, मुगाच्या डाळीचे डोसे तसेच आपण सॅलेडमध्येही उकडलेले मूग खाल्ले असतील. अशातच आम्ही तुमच्यासाठी मूगाच्या डाळीची एक नवी रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचं नाव आहे मूग ढोकळा. आतापर्यंत आपण बेसनाचा ढोकळा खाल्ला असेल पण हा हेल्थी ढोकळा नक्की ट्राय करा. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा हा मूग ढोकळा.
मूग ढोकळा साहित्य – (Dhokla Ingredients)
एक वाटी मूगडाळ, 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा लिंबाचा रस, साखर, मीठ, इनोचं एक पाकीट
फोडणीसाठी – तेल, मोहरी, हिंग, मिरची ( कढीपत्ता आणि तीळ ऐच्छिक)
मूग ढोकळा कृती (Dhokla Recipe Marathi)
- ढोकळा करण्यापूर्वी मूगडाळ दोन-तीन तास आधी भिजत घालावी,
- भिजलेली डाळ थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन मिक्सरमध्ये रवाळ वाटावी.
- डाळ वाटतानाच त्यात आलं, लसूण आणि दोन मिरच्या घालाव्यात.
- त्यानंतर डाळीचे हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात मीठ, किंचित साखर, लिंबाचा रस आणि थोडी हळद घालून नीट मिसळावे
- मिसळल्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून गॅसवर ठेवावे.
- ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे, त्याला आतून सगळ्या बाजूने नीट तेल लावून घ्या. वरील मिश्रणात एका पाकिटातील सगळा इनो टाकून हलक्या हाताने पुन्हा एकदा नीट मिसळावं. हे मिश्रण आता तेल लावलेल्या भांड्यात ओतून भांडं कूकरमध्ये ठेवावं.
- साधारण हे मिश्रण 10-15 मिनिटं वाफवावे आणि गॅस बंद करुन 5-10 मिनिटं मिश्रण तसंच ठेवावे.
- त्यानंतर मिश्रण बाहेर काढून वाफ गेल्यावर त्याचे व्यवस्थित तुकडे करावेत.
- यानंततर फोडणीची तयारी करावी, फोडणीसाठी एका भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी, हिंग व मिरच्यांचे तुकडे टाकावेत.
नंतर चमच्याने ही फोडणी ढोकळ्यावर सगळीकडे पसरावी आणि वर छान कोथिंबीर गार्निश करावी. यानंतर गरमागरम मूग ढोकळ्याचा हिरव्या चटणीसोबत किंवा खजूर चटणीसोबत तुम्ही आस्वाद घेऊ शकता.
हे ही वाचा<< संत्री गोड आहे की आंबट कसे ओळखाल? संत्र्यावर निसर्गाच्या ‘या’ पाच खुणा पाहून सेकंदात करा परीक्षा
चला जाणून घेऊया मूग डाळ खाण्याचे फायदे
मूग डाळीमध्ये मॅग्नेशियम असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही मूग डाळीचा आहारात समावेश करू शकता. मूग डाळीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. ज्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो, यामुळे अनेक आजारांपासून बचाव होण्यासाठी मदत होते. यासोबतच त्यात भरपूर खनिजं, जीवनसत्त्वं, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर्स असतात, जे पचनास मदत करतात.
हे ही वाचा<< साऊथ इंडियन Curd Rice सह या उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा! पाहा सोपी मराठी रेसिपी
तर आजच ट्राय करुन पाहा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.