हिवाळा, थंडीचे दिवस आता हळू-हळू संपत आले आहेत. असे असले तरीही, बाजारात आपल्याला अजूनही पालक आणि मटार दिसत आहेत. अशामध्ये या दोन गोष्टींपासून प्रथिनयुक्त आणि फायबरयुक्त असा पौष्टिक ढोकळा एकदा नक्कीच बनवून पाहण्यासारखा आहे. लहान मुलांना जर नुसत्या पालकाची भाजी खायला आवडत नसेल तर, त्यांच्यासाठी ही अगदीच भारी रेसिपी आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @nehadeepakshah नावाच्या अकाउंटने या हिरव्या ढोकळ्याची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी शेअर केलेली आहे. हा ढोकळा तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी म्हणून खाऊ शकता किंवा संध्याकाळी मधल्यावेळेत भूक लागते तेव्हा, अरबटचरबट काही जाण्याऐवजी या ढोकळ्याची निवड करू शकता. हा हिरवा ढोकळा नेमका बनवायचा कसा, ते पाहा.
हेही वाचा : Recipe : ‘या’ पद्धतीने बनवलीत तर सिमला मिरचीसुद्धा सगळे आवडीने खातील; भाजीची रेसिपी, प्रमाण लिहून घ्या….
पालक-मटाराचा हिरवा ढोकळा रेसिपी
साहित्य
८ ते १० पालकाची पाने
अर्धा कप मटार
आले
१ हिरवी मिरची
६ ते ७ कढीपत्ता
१ कप बेसन
१ लहान चमचा दही
१ लहान चमचा मोहरी
१ लहान चमचा तीळ
१ लहान चमचा हिंग
इनो/ बेकिंग सोडा
तेल
मीठ
साखर
पाणी
कृती
- सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये पालक आणि मटार काही मिनिटांसाठी उकळवून घ्या.
- आता पालक आणि मटार गार झाल्यावर त्यांना मिक्सरच्या भांड्यात घालून घ्या. त्यामध्ये मिरची, आले घालून सर्व पदार्थांची एक पेस्ट बनवून घ्या.
- एका बाऊलमध्ये बेसन, तयार केलेली मटार-पालकाची पेस्ट, दही, चमचाभर तेल आणि मीठ घालून सर्व मिश्रण ढवळून घ्या. त्यामध्ये पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची मात्र काळजी घ्या.
- आता यामध्ये इनो घालून पुन्हा एकदा ढोकळ्यासाठीचे मिश्रण ढवळून घ्या आणि १० मिनिटांसाठी फुलण्यासाठी बाजूला ठेऊन द्या.
- दहा मिनिटांनंतर एका डब्यात किंवा गोलाकार ट्रेमध्ये तयार ढोकळ्याच्या पिठाचे मिश्रण घालून घ्या.
हेही वाचा : Recipe: कडू-कडू कारलीदेखील अगदी आवडीने अन् गोडीने खाल; पाहा ही मसालेदार कारल्याची रेसिपी
- गॅसवर एक खोलगट पातेलं घेऊन, त्यामध्ये पाणी घालून घ्या. या पातेल्यात कुकरमध्ये ठेवतो तसा लहानसा स्टॅन्ड ठेवा.
- या पातेल्यात आता ढोकळ्याच्या पिठाचा डबा ठेऊन २० ते ३० मिनिटांसाठी शिजवून घ्यावे.
- ढोकळ्या म्हंटले कि त्यावर मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी येणारच. त्यासाठी एका लहानश्या पातेल्यात तेल तापवत ठेवा.
- तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी, हिंग, तीळ, कढीपत्ता घालून सर्वात शेवटी यामध्ये पाणी घालून घ्या.
- तयार फोडणी आपल्या पालक आणि मटार ढोकळ्यावर घालून घ्या.
- सर्वात शेवटी तुम्हाला हवे असल्यास ओले खोबरे आणि डाळिंबाच्या दाण्यांनी या हिरव्या ढोकळ्यावर सजावट करून घ्या.
तयार आहे आपला पालक आणि ढोकळ्यापासून बनवलेला पौष्टिक हिरवा ढोकळा.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत ५२१K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.