शुभा प्रभू साटम
ही आंध्र प्रदेशची पाककृती आहे. तांदळाची भाकरी आणि उत्तप्पा यांच्या मधला असा हा प्रकार म्हणता येईल.
साहित्य :
इडली रवा १ वाटी, उडीद डाळ १/२वाटी, अर्धा चमचा जिरे, मीठ, साखर, तेल किंवा तूप.
ऐच्छिक साहित्य – तळलेले काजू, मोहरी, चणा डाळ, कढीलिंब, लाल सुक्या मिरच्या यांची फोडणी/ कांदा हिरवी मिरची (परतलेली.)
कृती
उडीद डाळ साधारण चार तास भिजत घालावी. रवा मात्र फक्त १५ मिनिटे भिजवून मग निथळवून, पिळून घ्यावा. डाळही निथळवून अगदी मुलायम वाटून घ्यावी. इडली रवा त्यात एकत्र करावा. आता यामध्ये जिरे, मीठ, साखर घालून घ्यावे. यासोबत वर दिलेल्या ऐच्छिक साहित्यापैकी तुम्हाला जे आवडत असेल ते या मिश्रणात घालून घ्या. आता एका खोलगट कढईत तेल किंवा तूप गरम करावे. त्यात डाळ-रव्याचे मिश्रण घालावे. हे मिश्रण पातळ पसरू नये. ते जाडसरच राहू द्यावे, एखाद्या केकप्रमाणे मंद आचेवर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावे. वाटल्यास बाजूने तेल-तूप सोडत राहावे, म्हणजे ते कढईला चिकटणार नाही. छान भाजले की तयार झाली तुमची खमंग डिब्बा रोटी.
आता हिचे केकप्रमाणे तुकडे करून घ्यावे आणि टोमॅटो किंवा खोबऱ्याच्या चटकदार चटणीबरोबर फस्त करावे.