Diwali 2023: दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात फराळाची लगबग सुरू झाली आहे. विशेषत: महाराष्ट्रात अनेकांच्या घरात दिवाळीनिमित्त खास वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, बऱ्याचदा हे पदार्थ बनवताना वेळही कमी पडतो. यात काहीवेळा एखादा पदार्थ बनवताना प्रमाण चुकते आणि पदार्थ बिघडतो. पण, आज आम्ही तुम्हाला दिवाळीनिमित्त चकली, करंजी, लाडू, चिवडा याची नाही तर खास पाकातली चंपाकळी कशी करायची याची रेसिपी सांगणार आहोत. चंपाकळी ही विशेष आकाराची गोड, खारी अशी शंकरपाळी असते. ही शंकरपाळी दिसायला छान असते आणि बनवायलाही सोपी आहे. चला तर जाणून घेऊ साहित्य आणि कृती…
साहित्य
१) दीड वाटी बारीक रवा
२) साजूक तूप तळण्यासाठी
३) चवीनुसार मीठ
पाकासाठी लागणारे साहित्य
१) २ कप साखर
२) वेलचीपूड
३) १/४ टीस्पून खाण्याचा केशरी रंग
४) १/२ टी स्पून लिंबाचा रस
कृती
सर्व प्रथम रवा एका पात्रात घेऊन त्यात गरम साजूक तुपाचे मोहन व मीठ घालून मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या. यानंतर हे पीठ तासभर तसेच झाकून ठेवा.
पीठ चांगले मुरल्यावर त्याचे एकसारखे गोळे बनवून मोठी पातळ पोळी लाटून एक वाटीच्या साहाय्याने छोट्या गोल पुऱ्या बनवा. मग एक पुरी घेऊन त्याच्या मधोमध उभ्या काप द्या, यावेळी कडेला पुरी तुटू नये हे लक्षात ठेवा. काप मारल्यावर पुरी गुंडाळून कडेच्या दोन बाजूला दाबून घ्या. अशाप्रकारे सर्व चंपाकळी बनवून घ्या. आता तयार चंपाकळी ओल्या कापडावर झाकून ठेवा, जेणे करून त्या सुकणार नाहीत.
आता पाक करण्यासाठी सर्वप्रथम पातेल्यात साखर घ्या, त्यात साखर बुडेल एवढेच पाणी घाला, यानंतर ते उकळून घ्या. साखर वितळल्यानंतर त्यात लिंबाचा रस, वेलची पूड आणि केसरी रंग घाला. अशाप्रकारे दोन तारी पाक तयार करा.
आता कढईत साजूक तूप गरम करून त्यात चंपाकळी सोडा. तुपात चंपाकळी ओपन झाल्यावर तिला छान आकार येईल, चंपाकळी तुपात सोडल्यावर गॅस मंद करून छान कुरकुरीत गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. मग तयार चंपाकळी पाकात सोडून त्या नीट हलवा आणि प्लेटमध्ये काढून घ्या, अशाप्रकारे चंपाकळी खाण्यासाठी तयार….