Diwali Faral Recipe 2024: दिवाळीसाठी तुमच्याही घरात फराळाची लगबग सुरू असेल. लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा, चकली असे विविध पदार्थ बनविण्यासाठी तयारी सुरू आहे. अनेक जण फराळ बनविताना चकली शेवटी बनवतात. कारण- चकल्या बनविण्यासाठी वेळ तर खूप जातोच. पण, त्या नीट झाल्या नाहीत, तर हिरमोडदेखील होतो. फराळातील सर्व गोड पदार्थांमध्ये चकली थोडी तिखट असल्याने अनेकांना ती आवडते. त्यात जर चकली खमंग, कुरकरीत झाली असेल, तर ती खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. त्यामुळे फराळ खाताना अनेक जण आधी चकली उचलतात. पण दरवर्षी एकाच चवीच्या एकाच प्रकारच्या चकल्या काही वेळा नकोशा वाटू लागतात. त्यामुळे आम्ही दिवाळीनिमित्त खास तुमच्यासाठी चकलीचे पाच वेगवेगळे प्रकार घेऊन आलो आहोत. यंदा त्या पाच प्रकारांपैकी तुम्हाला आवडेल तो चकलीचा प्रकार तुम्ही बनवू शकता. पण, त्याआधी चकलीच्या पाचही प्रकारांसाठी लागणारे साहित्य आणि त्यांची कृती नेमकी कशी असेल ते जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चकलीचे ‘हे’ पाच चविष्ट प्रकार, जाणून घ्या साहित्य आणि कृती

१) बाजरीची चकली

साहित्य

१) बाजरीचे पीठ – १ कप
२) रवा – १/४ कप
३) बेसन – १/४ कप
४) लाल तिखट – १/२ टीस्पून
५) कॅरम सीड्स – १/२ टीस्पून
६) मीठ चवीनुसार
७) पाणी

कृती

बाजरीची चकली बनविण्यासाठी सर्वप्रथम सर्व साहित्य म्हणजे बाजरीचे पीठ, रवा, बेसन, लाल तिखट, कॅरम सीड्स, मीठ एका भांड्यात मिसळून घ्या. त्यानंतर त्यात हळूहळू पाणी घालून, पीठ चांगले मळून घ्या. त्यानंतर एक छोटा तुकडा घेऊन, त्याचा लांब रोल करा. हा रोल चकलीच्या भांड्यात टाका आणि हळूहळू चकल्या बनवा. चकली तळण्यापेक्षा एअर फ्राईंग किंवा बेकिंग हा उत्तम व आरोग्यदायी पर्याय आहे.

चकल्या काही वेळ बेक केल्यानंतर किंवा तळल्यानंतर बाहेर काढा आणि त्या थंड करण्यासाठी ठेवा. आता तुम्ही या बाजरीच्या चकल्या गरम चहासोबत किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

२) मुगाच्या डाळीच्या चकल्या

साहित्य

१) मुगाची डाळ – २५० ग्रॅम
२) धणे-जिरे पूड – २ चमचे
२) तीळ – १ चमचा
३) ओवा – १ चमचा
४) तेलाचे मोहन – २ चमचे
५) तिखट- अंदाजे
६) मीठ – चवीनुसार
७) हळद- अंदाजे
८) थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
९) थोडेसे डाळीचे पीठ

कृती

सर्वप्रथम मुगाची डाळ दोन ते तीन तास भिजत ठेवा. त्यानंतर ती डाळ स्वच्छ धुऊन, कुकरमधून तीन शिट्या काढून शिजवून घ्या. शिजविताना त्यात अगदी थोडे पाणी घाला. शिजलेली डाळ चमचाने थोडी बारीक करून घ्या. त्यानंतर त्यात वरील सर्व साहित्य मिसळा. तयार मिश्रण थोडे घट्ट होण्यापुरते डाळीचे पीठ घाला. नंतर नेहमीप्रमाणे चकल्या बनवून, त्या तळून घ्या.

३) बेसन मसाला चकली

साहित्य

१) बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ) – २ कप
२) तांदळाचे पीठ – १/२ कप
३) लाल मिरची पावडर- १ चमचा
५) पांढरे तीळ – २ चमचे
५) ओवा – १ चमचा
६) बेकिंग पावडर – १/४ चमचा
७) ताजी मलई – २ चमचे
८) गरम तेल (मोहन) – २ चमचे
९) चवीनुसार मीठ
१०) चकली तळण्यासाठी तेल

कृती

सर्वांत आधी बेसनाचे पीठ लालसर होईपर्यंत भाजून घ्या. जेणेकरून खाताना ते पीठ कच्चे लागणार नाही. त्यानंतर भाजलेले बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, लाल मिरची पावडर, तीळ, बेकिंग पावडर, तीळ, मलई, मीठ घालून चांगले मिसळून घ्या. मग त्यामध्ये गरम तेलाचे मोहन घालून पीठ मळून घ्या. आता मळलेले पीठ १०-१५ मिनिटे तसेच झाकून ठेवा. त्यानंतर चकली बनविण्याच्या भांड्याला आतून पाण्याचा हात लावून, त्यात चकलीचे पीठ भरून घ्या आणि प्लास्टिकच्या पेपरवर चकल्या पाडा. त्यानंतर कढईल तेल चांगले गरम झाल्यानंतर एकेक करून सर्व चकल्या मंद आचेवर तळून घ्या.

४) पालक चकली

साहित्य

१) पालक पेस्ट – १ कप
२) ज्वारीचे पीठ – १ कप
३) तांदळाचे पीठ – १ कप
४) लसूण पेस्ट – १/२ चमचा
५) लाल मिरची पावडर – १ चमचा
६) अनारदाना पावडर (डाळिंबाच्या सुकलेल्या दाण्यांची पावडर) – १ चमचा
७) तेल (गरम मोहन) – २ चमचे
८) तीळ – २ चमचे
९) जिरे (कुटून) – १ चमचा
१०) मीठ – चवीनुसार
११) तेल चकली तळण्यासाठी

कृती

प्रथम पालक स्वच्छ साफ करून, धुऊन मग उकडून त्याची पेस्ट करून घ्या. त्यानंतर एका परातीत पालक पेस्ट, ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, लसूण पेस्ट, तीळ, जिरे, लाल मिरची पावडर, अनारदाना पावडर (डाळिंबाच्या दाण्यांची पावडर) मिसळून, त्यामध्ये चांगले गरम झालेले तेल घालून हे मिश्रण मळून घ्या. हे मिश्रण मळण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता.

पीठ जास्त घट्ट मळू नका; अन्यथा चकल्या तेलात तळताना तुटण्याची शक्यता असते. त्यानंतर मळलेल्या पिठाचा गोळा चकलीच्या भांड्यात भरा आणि प्लास्टिकच्या पेपरवर चकल्या पाडून घ्या. कढईमध्ये सर्व चकल्या तेलात गरम मध्यम आचेवर तळून घ्या.

५) तांदळाच्या चकल्या

साहित्य

१) तांदळाचे पीठ – १ वाटी
२) पाणी – १ वाटी
३) लोणी – पाव वाटी
४) जिरे – १ चमचा
५) ओवा – १ चमचा
६) मिरची पेस्ट – २ चमचे (वाटलेली)
७) तळणीसाठी तेल
८) चवीपुरते मीठ

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात तांदळाचे पीठ घ्या. पण त्याआधी एका लहान पातेल्यात मीठ आणि पाणी गरम करून घ्या. त्यानंतर त्यात जिरे, ओवा, मिरची पेस्ट व लोणी घाला. लोणी विरघळून पाणी उकळले की, लगेच ते तांदळाच्या पिठात घालून मिसळा. १५ मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा. मिश्रण कोमट झाले की, चांगले मळून घ्या. त्यानंतर चकली बनविण्याच्या भांड्यात पीठ घालून चकल्या तयार करा. थोड्या लालसर होईपर्यंत या चकल्या तळून घ्या.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali faral recipe 4 different easy types of chakali recipes for this diwali 2024 sjr