दिवाळी येणार म्हटलं की, घरी फराळ बनवण्यास सुरुवात होते. चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी हे पदार्थ फराळात ठरलेले असतात. प्रत्येकाच्या घरी त्यांच्या पद्धतीनुसार तुम्हाला फराळात कोणतातरी वेगळा पदार्थ नक्कीच आढळेल. दिवाळीत एखादा अनोखा गोड पदार्थ बनवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका खास पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत, ज्याचं नाव आहे “मखमल पुरी.” हा पदार्थ तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि तुमच्या फराळात याचा समावेश करा आणि कुटुंबाबरोबर हा पदार्थ इतरांना देऊन त्यांचे तोंड गोड करा.
साहित्य :
- अर्धा किलो मैदा
- दोन वाटी बारीक किसलेलं खोबर
- अर्धा किलो साखर
- फूड कलर (पिठानुसार – अर्धा चमचा)
- तेल
- मीठ
- वेलची पूड (अर्धा चमचा)
कृती :
- सगळ्यात आधी अर्धा किलो मैदा चाळणीमधून चाळून घ्या.
- गॅसवर एका भांड्यात अर्धी वाटी तेल गरम करून घ्या.
- परातीत मैदा घेऊन गरम करून घेतलेलं तेल त्यामध्ये टाका आणि तेल टाकल्यावर मिश्रण एकजीव करून घ्या. त्यानंतर पीठ मळून घ्या व चवीनुसार थोडं मीठ घाला.
- चमचाभर पाण्यात फूड कलर (Food Colour) मिक्स करा आणि मग ते पिठात टाकून आणि मळून घ्या. त्यानंतर १५ मिनिटे किंवा अर्धा तास पीठ झाकून ठेवा. (फूड कलरमध्ये तुम्ही भगवा किंवा पिवळा रंग वापरू शकता)
- पीठ मळून झाल्यावर सगळ्यात आधी पाक तयार करून घ्या.
- गॅसवर टोप ठेवून त्यात दीड ग्लास पाणी, दोन वाटी साखर टाकून पाक तयार होईपर्यंत चमच्याने हलवत रहावे.
- (टीप : जेवढा पाक चांगला होईल तेवढ्या पुऱ्या चविष्ट लागतात) पाक तयार झाला आहे का, तपासावे आणि गॅस बंद करावा आणि वरून वेलची पूड टाकावी.
- त्यानंतर पिठाचे गोळे करून छोट्या-छोट्या पुऱ्या लाटून घ्या.
- नंतर गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवा आणि पुरी तळायला सुरुवात करा आणि तळताना पुरी जेव्हा नरम असते, तेव्हा चमच्याच्या सहाय्याने दुमडून घ्या आणि नंतर पुरी दोन्ही बाजूने कडक तळून झाल्यावर झाऱ्याच्या सहाय्याने तेलातून बाहेर काढा.
- सगळ्या पुऱ्या तळून झाल्यावर पाकात बुडवून घ्या आणि त्यावर लगेच बारीक किसलेलं खोबरं आणि साखर घाला.
- अशाप्रकारे तुमची ‘मखमल पुरी’ तयार.