Diwali Faral Recipe 2023 : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे अनेकांच्या घरी साफसफाई, सजावट आणि फराळाची तयारी सुरू झाली आहे. यातील फराळासाठी खूप वेळ जातो; कारण फराळात अनारसे, चकली, शंकरपाळी, चिवडा, लाडू, करंज्या असे सर्व पदार्थ तयार केले जातात. यात काही जण आवडीने खुसखुशीत गोड साटोऱ्यादेखील बनवतात. हा पदार्थ काहींसाठी नवीन असेल, पण तो चवीला फार रुचकर लागतो. अनेकजण याला साटोऱ्या किंवा सांजोरी असे म्हणतात. त्यामुळे आज आपण रवा आणि मैद्यापासून खुसखुशीत साटोऱ्या कशा बनवायच्या हे जाणून घेऊ या. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साटोऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१/२ कप मैदा, २ चमचे रवा, १/२ कप तेल, १/२ कप साजूक तूप, १ कप पाणी, चिमूटभर वेलची पूड, १ कप पिठीसाखर, १ कप किसलेले खोबरे.
कृती
साटोऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, रवा आणि चवीनुसार मीठ घाला. हे सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिसळा. आता भांड्यात थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण चांगले मळून घ्या. आता मळलेल्या पिठाला चांगलं सेट होण्यासाठी दोन ते तीन तास तसेच ठेवा.
Diwali Special Recipe : दिवाळीनिमित्त बनवा पाकातली कुरकरीत, खमंग चंपाकळी; जाणून घ्या सोपी रेसिपी
साटोऱ्याचे सारण तयार करण्याची कृती
एका भांड्यात बारीक किसलेले सुके खोबरे, पिठीसाखर, चिमूटभर वेलची पूड मिसळा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात ड्रायफ्रुटसही टाकू शकता. आता या तयार सारणाचे लहान-लहान लाडू वळून घ्या.
आता मळलेल्या पिठाचे लहान गोळे करून घ्या. आता एक एक गोळा लाटून त्याला पुरीचा आकार द्या. लाटलेल्या पुरीत सारणाचे वळून घेतलेला लाडू भरून पुरीचा पुन्हा गोल गोळा करा, तुम्ही पुरणाची पोळी बनवण्यासाठी ज्याप्रकारे मळलेल्या पिठाच्या गोळ्यात सारण भरता त्याचप्रकारे हे सारण भरायचे आहे.
आता सारण भरलेला गोळा पोळीप्रमाणे नीट लाटून घ्या. या लाटलेल्या पोळीस एका पॅनमध्ये थोडसं तूप घालून शेकून घ्या. दोन्हीकडून चांगल्या प्रकारे तांबूस रंग येई पर्यंत या पोळ्या शेकवा. अशाप्रकारे साटोरी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेकल्यावर साटोर्या तुपात तळूनदेखील घेऊ शकता. ज्यामुळे साटोऱ्या अगदी खुसखुशीत होतात आणि जास्त दिवस राहतात.