दिवाळीनिमित्त अनेकांच्या घरात फराळाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. काहींनी तर फराळातील अनेक पदार्थ बनवलेही असतील. त्यामुळे अनेकांच्या घरात आता पुढील काही दिवस चकली, चिवडा, लाडू अशा विविध पदार्थांनी भरलेले ताट समोर केले जाईल, खरं तर दिवाळीच्या फराळात पारंपारिक पदार्थ्यांबरोबर इतर अनेक पदार्थ बनवले जातात, पण सध्या कामाच्या धावपळीत हे पदार्थ बनवण्यासाठी अनेकांकडे वेळ नसतो. यातीलच एक पदार्थ म्हणजे चिरोटे.
पूर्वी अनेकांच्या घरी दिवाळीनिमित्त चिरोटे बनवले जायचेय . चिरोटे हे साध्या किंवा पाकातले अशा दोन पद्धतीने केले जातात. यामुळे यंदाही दिवाळीनिमित्त साधे गोडाचे चिरोटे कसे करायचे हे पाहूयात.
साहित्य –
१) रवा – १ वाटी
२) मैदा – अर्धा ते पाऊण वाटी
३) तूप
४) तेल
५) तांदूळाचं पीठ – अर्धा वाटी
६) पीठीसाखर
कृती –
रवा व मैदा एकत्र करुन त्यात तेलाचं मोहन घालून चांगलं एकत्र करुन घ्यावं. त्यानंतर हे पीठ घट्ट भिजवून घ्या. हाताला तेल लावून या पीठाचे लहान लहान गोळे तयार करा. दुसरीकडे तांदळाची पिठी अर्धी वाटी व दोन चमचे घट्ट तूप एकत्र करून चांगले एकजीव करावे. हे मिश्रण हलके व्हायला हवे. त्यानंतर पिठापासून केलेले गोळे घ्या. यात एका गोळ्याची पातळ पुरी लाटून त्यावर तांदळाची पिठी-तूपाच्या मिश्रणाचा थर लावा. पुन्हा त्यावर एक लाटलेली पुरी ठेवा. तुम्हाला हवे तेवढे थर लावा. त्यानंतर मंद गॅसवर हलक्या हाताने या पुऱ्या तळून घ्या. सगळ्या पुऱ्या तळून झाल्यानंतर त्यावर पिठीसाखर तुमच्या आवडीप्रमाणे भूरभूरवा.