उन्हाळा सुरु झाला आहे. त्यातच मे महिन्याचा उष्मा किती धोकादायक असतो हे आपणा सर्वांनाच माहित आहे. अशा परिस्थितीत उष्णतेपासून वाचण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात अशा गोष्टींचा आहारात समावेश करा जेणेकरून शरीर आतून थंड राहील. आज आम्ही तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी रेसिपी घेऊन आलो आहोत. नारळाचे दूध व कोकमच्या आंबट आगळापासून तयार होणारी ही रेसिपी, पचनसंस्थेसाठी उत्तम मानली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवायची कोकम कढी.
कोकम कढी साहित्य –
- एका नारळाचे दूध
- ५-६ कोकम, ६ हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या
- पाव चमचा हळद, अर्धा वाटी कोथिंबीर
- ४ मोठे चमचे तेल, मीठ चवीनुसार
कोकम कढी कृती –
सर्वप्रथम एका ताज्या नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घ्या, त्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा. सुती कापडाने तयार प्युरी गाळून घ्या, व त्यातून नारळाचे दूध वेगळे काढून घ्या. त्यानंतर कोकम, मिरच्या, कोथिंबिरीचे वाटण वाटून घ्या. लसूण ठेचून घ्या. पातेल्यात तेल गरम करुन त्यात लसणीचा ठेचा परतवा. नंतर हिरवे वाटण टाका, थोडी हळद टाकून त्यावर नारळाचे दूध टाका व नंतर चवीनुसार मीठ टाका. हे सर्व मिश्रण एकत्र करुन घ्या. आता कोकमकढी फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. अशा प्रकारे कोकमकढी रेडी आहे.
हेही वाचा – उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा टेस्टी आईस्क्रीम; जाणून घ्या सोपी रेसिपी
ही कोककढी तुम्ही एकदा घरी ट्राय करुन नक्की पाहा, विशेषत: जेव्हा नॉनव्हेजचं जेवण असेल तेव्हा नक्की बनवा. कोकमकढी पचनसंस्थेसाठी उत्तम असते.