Tiffin Recipes Aloo Poha Roll Recipe : लहान मुलं अनेकदा खाण्या-पिण्याच्या बाबतीत खूप चिडचिड करतात. कितीही चांगलं काही बनवून दिलं तरी ते खातील की नाही, असा प्रश्न असतो. पण अनेक लहान मुलांना काहीतरी चटपटीत, कुरकुरीत पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या लहान मुलांसाठी असाच काहीसा चटपटीत पदार्थ बनवायचा असेल, तर तुम्ही चविष्ट आलू पोहा रोल ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. हा पदार्थ झटपट बनून तयार होतो. त्याशिवाय सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी टिफिनसाठी हा उत्तम पदार्थ आहे. लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही याची चव फार आवडेल.

आलू पोहा रोल रेसिपीसाठी लागणारे साहित्य (Aloo Poha Roll Recipe)

१) ३ ते ४ उकडलेले बटाटे
२) १/२ कप पोहे
३) २ ब्रेड स्लाईस
४) १ टीस्पून धणे पावडर
५) १ टेबलस्पून हिरवी कोथिंबीर
६) १/२ टीस्पून चाट मसाला
७) तळण्यासाठी तेल
८) चवीनुसार मीठ

जाणून घ्या कृती

सर्वप्रथम ३ ते ४ बटाटे कुकरमध्ये टाकून ४ शिट्या करून उकडून घ्या. त्यानंतर थंड झाल्यावर ते सोलून एका भांड्यात ठेवा. त्यानंतर ब्रेडचे तुकडे करून बटाट्यात चांगले मिक्स करा.

आता १० ते १५ मिनिटे पोहे पाण्यात भिजवत ठेवा. त्यानंतर बटाटा-ब्रेड क्रंब्ससह चांगले मॅश करा. सर्व मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर त्यात चाट मसाला, धणे पूड व हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा.

त्यानंतर तयार मसाल्यापासून दंडगोलाकार रोल तयार करून, ते एका प्लेटमध्ये ठेवा. आता कढईत तेल चांगले गरम करा. त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून, रोल तळून घ्या.

बटाटा पोहे रोल गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर ते प्लेटमध्ये काढा. हे रोल नीट शिजण्यासाठी दोन ते पाच मिनिटे लागतील. नाश्त्यासाठी हे चविष्ट बटाटा पोहा रोल नक्कीच बेस्ट पर्याय आहे. जे तुम्ही हिरवी चटणी वा टॉमेटो सॉसबरोबर खाऊ शकता.