Nylon Sabudana Chivda : साबुदाणा खायला सगळ्यांना आवडतो. मग साबुदाण्याची खिचडी असो किंवा वडे; खाण्यासाठी सर्व जण तुटून पडतात. पण नेहमी साबुदाणा खिचडी आणि वडे खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही वर्षभर टिकणारा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा ट्राय करू शकता. वाफवून उन्हात सुकविलेल्या साबुदाण्यापासून हा चिवडा बनविला जातो. विशेष म्हणजे तुम्ही एकदा का अशा प्रकारे साबुदाणे वाफवून, धुऊन उन्हात सुकवून ठेवले, तर वर्षभर तुम्ही त्यापासून काही मिनिटांत हा चिवडा बनवू शकता. तळल्यानंतर नायलॉन साबुदाणा दुपटीने फुलतो. चला तर मग हा नायलॉन साबुदाणा चिवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहू…
साहित्य
२ वाटी साबुदाणा
१ बटाटा
२ हिरव्या मिरच्या
मूठभर शेंगदाणे
चवीनुसार मीठ
कृती
दोन वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घ्या. त्यानंतर सकाळी एका चाळणीला तेल लावून, त्यात हा साबुदाणा टाका. त्यानंतर एका कढईत पाणी गरम ठेवत, त्यावर हा साबुदाणा वाफवून घ्या. तुम्ही जास्त साबुदाणे भिजवले असतील, तर ते वाफविण्यासाठी वेळ जास्त लागेल. त्यानंतर तुम्ही वाफवलेला साबुदाणा थंड पाण्यात टाका. त्याचा एकेक दाणा मोकळा मोकळा होऊ द्या. त्यानंतर पुन्हा साबुदाणा चाळणीत ओतून, त्यातील पाणी निथळून घ्या. मग एका मोठ्या प्लास्टिकच्या पेपरवर हा साबुदाणा कडकडीत उन्हात दोन दिवस सुकवून घ्या. त्यानंतर एका कढईत तेल गरम करून, तो मस्त तळून घ्या. त्यानंतर त्यात बटाट्याचे तळलेले किस, तळलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे, तळलेले शेंगदाणे आणि त्यावर चवीनुसार मीठ टाका. मग सर्व मिश्रण एकत्र करा. आता अशा प्रकारे तुमचा नायलॉन साबुदाणा चिवडा खाण्यासाठी तयार झाला आहे.