सुटीच्या दिवशी किंवा घाईगडबडीत असताना, झटपट एखादं सँडविच बनवून खाल्लं की पोट एकदम मस्त भरतं. आपल्या आवडी व चवीनुसार हवे ते पदार्थ घालून सँडविच बनवता येतं. तुम्हाला सुटीच्या दिवशी अरबट-चरबट खाण्याची इच्छा झाली तरी आणि कधी पौष्टिक खायचं असेल तरीही सँडविच हा पदार्थ तुमच्यासाठी कायम हजर असतो. जॉन मॉन्टेग्यू यांच्या स्मरणार्थ ‘सँडविच दिवस’ साजरा केला जातो. जॉन मॉन्टेग्यू यांनी जगातील पहिले सँडविच तयार केले होते, असं म्हणतात.
घरी संपूर्ण धान्यापासून (Wholegrain) तयार केलेल्या पावामध्ये भाज्या, अंडी, चिकन अशा अनेक पौष्टिक पदार्थांची भर घालून सँडविच तयार केलं जातं. हे सँडविच तुमची भूक भागवतं आणि बऱ्याच वेळासाठी तुमचं पोटदेखील भरलेलं राहतं .
जागतिक सँडविच दिवसानिमित्त सँडविचच्या या तीन खास रेसिपी नक्की बघा.
१. मेडिटेरीनियन चिबाटा [Mediterranean Ciabatta]
वन ८ कम्युनच्या, अगनीभ मुडी [chef Agnibh Mudi, one8 Commune] यांची ही रेसिपी कशी बनवायची ते पाहा.
साहित्य :
चिबाटा पाव १०० ग्रॅम
ग्रील केलेल्या भाज्या ८० ग्रॅम
बोकोंचिनी चीज ५० ग्रॅम
पेस्टो मेयो दोन चमचे
आइसबर्ग लेट्युस ३० ग्रॅम
बाल्सामिक व्हिनिगर
मीठ ४ ग्रॅम
काळी मिरी ६ ग्रॅम
ऑलिव्ह तेल १५ ग्रॅम
ग्रिल केलेल्या भाज्यांमध्ये हिरवी व पिवळी झुकिनी, लाल व पिवळी सिमला मिरची घ्या. या सर्व भाज्या २० ग्रॅम या प्रमाणात घ्याव्यात.
कृती :
चिबाटा पावाचे मधोमध दोन भाग करा. आता पावाच्या दोन्ही बाजूंना पेस्टो मेयो लावून घ्या. त्यानंतर पावाच्या एका भागावर लेट्युसची पानं ठेवून, त्यावर ग्रिल केलेल्या भाज्या ठेवा. त्यानंतर सँडविचमध्ये बोकोंचिनी चीज ठेवून, त्यावर थोडे बाल्सामिक व्हिनेगर घाला. पावाचा दुसरा भाग तयार केलेल्या सँडविचवर ठेवून ते सँडविच बंद करा. आता तयार आहे तुमचं मेडिटेरीनियन चिबाटा सँडविच.
हेही वाचा : तुमच्याही खिशात पैसे टिकत नाहीत? ही असू शकतात तुमच्या खर्चाची कारणं…
२. सिल्व्हियो मिक्स सँडविच
‘द पँट्री’चे शेफ सुभाष शिर्के [Chef Subhash Shirke, The Pantry] यांची ही रेसिपी पाहू.
साहित्य :
हिरवी सिमला मिरची ४० ग्रॅम
पिवळी सिमला मिरची ४० ग्रॅम
हिरवी झुकिनी ४० ग्रॅम
रिकोटा चीज ६० ग्रॅम
रॉकेट लेट्युस २० ग्रॅम
ओव्हनमध्ये भाजलेले टोमॅटो ३० ग्रॅम
मीठ ५ ग्रॅम
मिरपूड ३ ग्रॅमी
मल्टिग्रेन पाव २ नग
कृती :
ओव्हन १८० सेल्सियसवर [pre-heat ] गरम करून घ्या.
सिमला मिरचीमधील बिया काढून टाका. रंगीत सिमला मिरची आणि झुकिनीला उभं चिरून घ्या. एका बेकिंग ट्रेमध्ये चिरलेल्या भाज्या ठेवा. त्यावर मीठ, मिरपूड व थोडं तेल टाकून २० मिनिटांसाठी ओव्हनमध्ये ठेवा.
मल्टिग्रेन पावाचे तुकडे घ्या आणि त्यांनादेखील बेकिंग ट्रेवर ठेवून ओव्हनमध्ये भाजून घ्या. पाव हलके भाजा आणि जळणार नाहीत ना याची काळजी घ्या. आता हलक्या भाजलेल्या पावाच्या दोन्ही भागांवर रिकोटा चीज लावून घ्या.
ओव्हनमधील भाज्या शिजल्यानंतर त्यांना बाहेर काढा.
आता पावाच्या एका भागावर शिजवलेल्या भाज्या, ओव्हनमध्ये भाजलेले टोमॅटो, रॉकेट लेट्युसची पानं ठेवून, त्यावर मीठ व मिरपूड टाका. आता पावाचा दुसरा भाग घेऊन हे सँडविच बंद करा.
आता तयार आहे तुमचं सिल्व्हियो मिक्स सँडविच.
३. चॅम्पियन सँडविच
‘द पँट्री’चे शेफ सुभाष शिर्के [Chef Subhash Shirke, The Pantry] यांची ही रेसिपी पाहू
साहित्य :
ग्रिल केलेले चिकन १६० ग्रॅम
मल्टिग्रेन पाव २ नग
लेट्युस रॉकेट १५ ग्रॅम
घरगुती मेयोनीज ४० ग्रॅम
मीठ २ ग्रॅम
मिरपूड २ ग्रॅम
बटर २० ग्रॅम
हेही वाचा : स्त्रियांनो, शरीराला आवश्यक असणाऱ्या ‘या’ घटकाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
कृती :
ओव्हनला १८० सेल्सियसवर गरम करा. मल्टिग्रेन पावाच्या दोन्ही तुकड्यांना बटर लावून, ते ओव्हनमध्ये भाजून घ्या.
ग्रिल केलेल्या चिकनचे छोटे छोटे तुकडे करा आणि एक-एक करून पावाच्या एका भागावर ठेवा. त्यावर मीठ आणि मिरपूड टाका.
या सगळ्यावर मेयोनीज टाकून, त्यावर लेट्युस रॉकेटची पानं ठेवा. पावाचा दुसरा भाग घेऊन हे सँडविच बंद करा. आता तयार आहे तुमचं चॅम्पियन सँडविच.
हे सँडविच टोमॅटो सॉस किंवा मस्टर्ड सॉससोबत छान लागतं.