थंडीच्या दिवसांत बाजारात आवर्जून दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे गाजर, मटार. मग या गोष्टींपासून लोणचं, हलवा आणि आणखी काहीबाही पदार्थ आपण आवर्जून करतो. थंडीच्या दिवसांत एकूणच बाजारात फ्रेश आणि भरपूर भाज्या मिळतात. त्यातच आपल्याला एरवीपेक्षा जास्त भूक लागत असल्याने आणि शरीराला ऊर्जेची आवश्यकता असल्याने आपण भरपूर आणि पौष्टीक काही ना काही खात असतो. लालचुटूक गाजर अनेकांच्या आवडीचे असल्याने या काळात आपण आवर्जून गाजराचा हलवा करतो. नेहमी हलवा करुन कंटाळा आला असेल आणि जाता येता तोंडात टाकता येईल असे काही करायचे असेल तर गाजराची बर्फी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग याची सोपी रेसिपी पाहूयात.
गाजर बर्फी साहित्य
- १/२ किलो किसलेले गाजर
- १ कप साखर
- १ कप दुध
- १/२ कप बारीक रवा
- १/२ कप मिल्क पावडर
- १/२ चमचा वेलची पूड
- सुक्यामेव्याचे काप आवडीनुसार
- तूप
गाजर बर्फी कृती
प्रथम गाजर स्वच्छ धुवुन साले काढुन घ्या. कढईत रवा तूप न वापरता मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या व प्लेट मध्ये काढून घ्या.
सर्व गाजर किसुन घ्या. मिक्सर जारमधून जाडसर वाटून घ्या.
कढईत तीन,चार चमचे तुप गरम करुन त्यात गाजराचा किस घाला. याला छान सात,आठ मिनीटे परतुन छान वाफ येऊ द्या. आता यामध्ये दूध घालुन, पुर्ण दुध आटेपर्यंत शिजु द्या.
नंतर साखर घाला. साखर विरघळली की त्यात रवा, मिल्क पावडर घालून मिक्स करा व झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवून सर्व एकत्र चांगले शिजु द्या. छान घट्ट होउ द्या. शेवटी वेलची पूड घाला.
आता एका ताटाला किंवा टिनला तुपाने ग्रिसींग करुन हे मिश्रण त्यावर थापुन घ्या.त्यावर सुक्या मेव्याचे काप पसरवा आणि थंड झाल्यावर आवडेल त्या आकाराच्या वड्या पाडा. बर्फी तयार. अशाप्रकारे मस्त गाजर बर्फी खाण्यासाठी तयार आहे.