ज्योती चौधरी-मलिक
साहित्य
पाव किलो घेवडय़ाच्या शेंगा, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, १ लहान चमचा किसलेलं आलं, १ मोठा चमचाभर उडीद डाळ, पाव वाटी खोवलेलं खोबरं, २ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, साखर चिमूटभर, २ पळ्या तेल, १ चमचा मोहरी, चिमूटभर हिंग
कृती
घेवडय़ाच्या शेंगा धुवून, निवडून, चिरून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. ती तडतडली, की हिंग टाकावा. उडीद डाळ टाकावी. डाळ जरा तांबूस, खरपूस झाली की, कढीपत्याची पानं आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर चिरलेला कांदा टाकून चांगला परतावा. कांदा तांबूस झाल्यावर किसलेलं आलं टाकावं. हे थोडंसं हलवून त्यात चिरलेला घेवडा टाकावा. हे सर्व नीट एकत्र करून घ्यावे. मीठ, साखर घालून ढवळावे. झाकण घालून भाजी शिजू द्यावी. अधूनमधून ढवळावी. आवश्यकता भासल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा. भाजी शिजल्यावर त्यात खोबरं-कोथिंबीर घालून घ्यावे.