Gobi Manchurian Banned In Goas Mapusa : चायनीज पदार्थांचा उल्लेख केला जातो तेव्हा मनात येते ते म्हणजे नूडल्स आणि मंचुरियन. यांतील मंचुरियन हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा पदार्थ आहे. हल्ली अनेक लग्न समारंभांतही हा पदार्थ आवर्जून ठेवला जातो. मात्र, सध्या गोव्यात या पदार्थावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. कोबी मंचुरियन बनविताना त्यात सिंथेटिक रंगाचा होणारा वापर आणि अस्वच्छतेच्या कारणावरून गोव्यातील म्हापसामध्ये कोबी मंचुरियनवर बंदी घातली आहे. त्यामुळे तुम्हाला कोबी मंचुरियन हा खाद्यपदार्थ गोव्यातील म्हापसा येथील कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये किंवा रस्त्यावरील विक्रेत्याकडे दिसणार नाही. परंतु, गोव्यात बंदी असली तरी कोबी मंचुरियन रेसिपी नेमकी कशी बनवली जाते, ते आपण जाणून घेऊ.
कोबी मंचुरियन बनवण्यासाठी साहित्य
२ मध्यम आकाराचे फुलकोबी
२ चमचे कॉर्नफ्लोअर
४ चमचे टोमॅटो केचअप
४ सुक्या लाल मिरच्या
3 चमचे लसूण पेस्ट
१ चमचा हळद
१ कप चिरलेली हिरव्या कांद्याची पात
१ कप पाणी
१ कप रिफाइंड तेल
२ मध्यम शिमला मिरची (हिरवी मिरची)
२ चमचे मीठ
३ चमचे आले-मिरची-लसूण पेस्ट
२ टीस्पून तिखट मसाला
४ चमचे सोया सॉस
१ कप मैदा
अर्धा टीस्पून पांढरी मिरी पावडर
१ चमचा गरम मसाला
कोबी मंचुरियन कसे बनवायचे ? (how to make gobi manchurian in home)
सर्वप्रथम सर्व भाज्या नीट धुऊन कापून घ्या. त्यात फुलकोबी मध्यम आकारात कापून घ्या. मंचुरियन पीठ तयार करण्यासाठी एका मध्यम आकाराच्या भांड्यात भाज्या, मैदा, कॉर्नफ्लोअर, आले-मिरची-लसूण पेस्ट, मीठ आणि तिखट मसाला, पांढरी मिरी पावडर, हळद असे सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळून एकत्र करा.
त्यानंतर थोडेसे पाणी घालून चांगले पीठ तयार करा. अगदी भजी बनविण्यासाठी आपण ज्या प्रकारे पीठ भिजवतो, त्याचप्रमाणे हे पीठ भिजवून घ्या. त्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करा.
आता एक कढईत रिफाइंड तेल गरम करा आणि मंचुरियन तळून घ्या.
मंचुरियन सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या आणि त्यानंतर ते पेपर नॅपकिनवर काढा आणि बाजूला ठेवा.
हे मंचुरियन तुम्ही शेजवान चटणी, सॉस किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींबरोबर खाऊ शकता.