Gudi Padwa 2024: सण-उत्सव म्हटलं घरोघरी रुचकर पदार्थांचा बेत आखला जातोच. गुढीपाडव्याच्या दिवशीही घरच्या घरी स्वादिष्ट पदार्थ तयार करा आणि आपल्या कुटुंबीयांसाठी या पदार्थांचा आस्वाद घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरणपोळी साहित्य :-

  • २ कप हरभर्याची डाळ
  • १ १/२ कप चिरलेला गूळ
  • १/२ कप साखर
  • २ टिस्पून जायफळ पावडर
  • १ टिस्पून वेलची पावडर
  • २ टिस्पून साजूक तूप
  • १ १/२ कप गव्हाचे पीठ
  • १/२ कप मैदा
  • १/४ टिस्पून मीठ
  • १ टिस्पून तेल

बटाट्याची भाजी साहित्य :-

  • ४ उकडलेले बटाटे
  • ३ हिरव्या मिरच्या
  • १ आले
  • ७-८ कढिपत्ता
  • कोथिंबीर
  • ३ टिस्पून तेल
  • १/२ टिस्पून हळद
  • १/४ टिस्पून हिंग
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर

कटाची आमटी साहित्य :-

  • १ कप पुरणाचा कट
  • १/२ टेबलस्पून खिसलेले खोबरे
  • २ टिस्पून चिंचेचा कोळ
  • ३ टिस्पून गुळ
  • २ टिस्पून लाल तिखट
  • १ टिस्पून गोडा मसाला
  • १ टिस्पून धणे जीरे पावडर
  • ३ टिस्पून तेल
  • १/२ टिस्पून हळद
  • १/४ टिस्पून हिंग
  • ७-८ कढिपत्ता
  • कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार

भजी साहित्य :-

  • १ वाटी डाळीचे पीठ
  • २ टिस्पून लाल तिखट
  • २ टिस्पून ओवा
  • १/२ टिस्पून हळद
  • १/४ टिस्पून हिंग
  • कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी
  • शेंगदाणे चटणी साहित्य :-
  • १/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
  • १ टिस्पून लाल तिखट
  • १/४ टिस्पून साखर
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
  • १/४ कप दही

काकडी कोशिंबीर साहित्य :-

  • १ काकड्या
  • १/२ टेबलस्पून शेंगदाणे कुट
  • १/४ कप दही
  • १ हिरवी मिरची
  • १/४ टिस्पून साखर
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर

१) पुरणपोळी :-
हरभरा डाळ धुऊन शिजवून घ्या. शिजवलेल्या डाळीचे पाणी काढून डाळ पुरणयंत्रातून बारीक वाटून घ्यावी. वाटलेल्या डाळीत गुळ, साखर घालून चांगले परतून घ्यावे. पुरणात उलथणे उभे राहिले तर पुरण तयार झाले समजावे.आता त्यात वेलची पावडर, जायफळ पूड व २ चमचे तूप घालून चांगले परतून घ्यावे.

गव्हाच्या पिठात, हळद, मैदा व मीठ घालून पाणी घालून नेहमी पेक्षा थोडी सैल कणिक मळून तेल घालून 15-20 मि. ठेवावी. पुरण थंड झाल्यावर कणकेच्या दुप्पट पुरणाचे गोळे करावे.

कणकेची वाटी करून त्यात पुरणाचा गोळा भरून कणिकेची वाटी बंद करून पुरणपोळी हलक्या हाताने लाटून पोळी खमंग साजुक तूप सोडून तव्यावर भाजून घ्या.

२)बटाट्याची भाजी :-
उकडलेल्या बटाट्याची साले काढून फोडी करून घेणे. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद कढिपत्ता, हिरव्या मिरच्या घालून फोडणी करून त्यात बटाट्याच्या फोडी घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात मीठ व कोथिंबीर घालणे.

३)कटाची आमटी :-
हरभर्याची डाळ शिजवून ती चाळणीत उपसून जे पाणी निघते तो पुरणाचा कट. या कटाचीच आमटी केली जाते.
एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद कढिपत्ता घालून फोडणी करून त्यात पुरणाचा कट घालून, सर्व मसाले, चिंचेचा कोळ, मीठ व गूळ घालून चांगले उकळून घ्यावे. नंतर त्यात कोथिंबीर घालावी.

४)भजी:-
एका भांड्यात डाळीचे पीठ व सर्व मसाले,मीठ व आवश्यक तेवढे पाणी घालून भज्याचे पिठ तयार करून गरम तेलात तळून घ्यावे.

५) शेंगदाणे चटणी :-
मिक्सर जार मधे चटणीचे साहित्य घालून वाटून घ्यावे नंतर एका वाटी मधे चटणीचे साहित्य काढून त्यात दही घालून चांगले मिक्स करून त्यात कोथिंबीर घालावी.

६)काकडीची कोशिंबीर :-
काकडीची साले काढून ती चोचून घ्यावी. एका वाटी मधे चोचलेली काकडी, शेंगदाणे कुट, मीठ, दही, साखर,मिरची बारीक चिरून, कोथिंबीर मीठ घालून चांगले मिक्स करावे.

७) वरण भात व दही भात :-
नेहमी प्रमाणे तांदूळ व तूर डाळ धुऊन कुकर लावणे. वरण शिजल्यावर त्यात हळद, हिंग, गुळ, व मीठ चवीनुसार घालून चांगले उकळणे. भाताच्या मुदी पाडणे.

हेही वाचा >> गुढीपाडव्यासाठी पारंपरिक आणि स्पेशल “डाळिंबी उसळ” मन आणि जीभेची तृप्ती करणारी रेसिपी

एका ताटात उजव्या बाजूला लिंबाची फोड चटणी, कोशिंबीर तर उजव्या बाजूला बटाट्याची भाजी, कटाची आमटी,कुरवड्या, पापड्या तर मध्यभागी वरच्या बाजूला एक वरण भाताची व दुसरी दही भाताची मुद ठेवून, खाली पुरणपोळी वाढून त्यावर साजूक तूप घालून वर तुळशीचे पान घालून भगवंताला नैवेद्य अर्पण करावा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa 2024 special recipe naivedya thali for gudi padwa recipe puran poli katachi aamati bhaji recipe varan bhat recipe srk
Show comments