Sunday Breakfast Recipes : रविवार हा सुटीचा दिवस असल्याने त्या दिवशी सकाळी नाश्त्यात काय बनवायचं, असा प्रश्न गृहिणींना पडतो. त्यात महाराष्ट्रीय कुटुंबात रविवारचा नाश्ता म्हणजे काहीतरी वेगळं खायला मिळणार, असं ठरलेलं असतं. अशा वेळी कांदेपोहे, उपमा, शिरा, मेदू वडा, इडली, डोसा, असे वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. पण, आज आपण रविवारच्या नाश्त्यासाठी खास रोजच्या इडलीपेक्षा वेगळी अशी नाचणीची इडली कशी बनवतात ती रेसिपी पाहणार आहोत. बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी चवीलाही वेगळी आहे. चला तर मग नाचणीची इडली कशी बनवायची ते पाहू…
नाचणी-तांदळाची भाकरी नेहमीच खातो, खाऊन पाहा ज्वारीची ‘मसाला भाकरी’; ही घ्या सोपी रेसिपी
साहित्य
नाचणी (पीठ नाही, अख्खी नाचणी) – दोन वाट्या
उकडा तांदूळ – दोन वाट्या
उडीद डाळ – एक वाटी
मेथीचे दाणे- अर्धा चमचा
चवीनुसार मीठ.
कृती
सर्वप्रथम उदीड डाळ, तांदूळ, नाचणी वेगवेगळ्या भांड्यांत भिजवून ठेवा. मेथीचे दाणेदेखील एका भांड्यात भिजवत ठेवा. जवळपास पाच तास हे असेच ठेवायचे. त्यानंतर तांदूळ आणि नाचणी एकत्र वाटून घ्या आणि उडीद डाळ आणि मेथीही एकत्र वाटा. सगळं वाटून झालं की, नीट एकजीव करा. चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण शक्यतो रात्री फुगण्यासाठी ठेवा. म्हणजे सकाळपर्यंत पीठ छान फुगेल. शक्यतो हे मिश्रण मोठ्या भांड्यात ठेवा. कारण- ते खूप फुगलं, तर ते भांड्यातून बाहेर सांडतं. त्यानंतर पीठ पुरेसं फुगलं की डावेनं हळूहळू ढवळा. यामुळे पीठ चांगलं एकजीव होतं.
त्यानंतर इडली बनविण्याच्या भांड्यातच पुरेसं पाणी घ्या. त्यातील साचांना व्यवस्थित तेल लावून, त्यात पीठ घाला. पाणी उकळलं की, त्यात इडलीचा साचा ठेवून झाकण लावा. १२-१३ मिनिटं इडल्या चांगल्या वाफवा. वाफेद्वारे येणाऱ्या वासावरून तुम्हाला अंदाज येईल की, इडल्या तयार झाल्या आहेत की नाही. आता तयार इडल्या थोड्या थंड झाल्यावर त्या एका डिशमध्ये काढा. अशा प्रकारे तयार नाचणीच्या इडल्या तुम्ही चटणी किंवा सांबाराबरोबर खाऊ शकता.