धिरडे हा पदार्थ तुम्ही यापूर्वी कधी ऐकला असाल किंवा काहींनी तो खाल्लाही असेल. पटकन बनवून होणारा हा पदार्थ बेसनाच्या पोळीप्रमाणे दिसतो. अगदी पारंपरिक असलेला हा पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट लागतो. तुम्ही यापूर्वी बेसन, ज्वारी, गव्हाच्या पिठापासून बनवले जाणारे धिरडे खाल्ले असतील. पण, आज आपण मैदा आणि चिकनपासून धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यामुळे ज्यांना मांसाहार आवडतो त्यांनी चिकन धिरड्याची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा..
साहित्य
चिकनचे धिरड्याचे कणीक मळण्यासाठी लागणारे साहित्य
१) १ कप मैदा
२) १ अंडे
३) १ ते १/२ कप दूध
४) १/२ चमचा मीठ
चिकन धिरड्यातील सारणासाठी लागणारे साहित्य
१) १ कप चिकन
२) १ कांदा
३) १ बटाटा
४) २-३ हिरव्या मिरच्या
५) २-३ लसूण पाकळ्या
६) आल्याचा १ लहान तुकडा
७) चवीनुसार मीठ
८) हळद
९) १/२ चमचा गरम मसाला
चिकनचे धिरडे बनवण्याची कृती
सर्वप्रथम मैद्यामध्ये अंडे, मीठ, दूध घालून बॅटर तयार करून घ्या. त्यानंतर त्यात चिकन बारीक चिरून चांगले शिजवून घ्या. आता कांदा बारीक करून थोड्या तेलात लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. त्यानंतर त्यात शिजलेले चिकन, आले, लसूण, बारीक किसून त्यात टाका, यानंतर गरम मसाला, मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्या. आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून मिश्रण एकजीव करून ठेवा.
त्यानंतर नॉनस्टिक तवा ठेवून बेताच्या आकाराची धिरडी घालून घ्यावी. धिरडी खालच्या बाजूने चांगली भाजल्याशिवाय परतू नये. आता धिरड्याच्या मध्यभागी तयार चिकन घालून, धिरड्याची डोशाप्रमाणे घडी करून गरमागरम सर्व्ह करा.