हिवाळ्यातील कडक थंडीला आता सुरुवात झाली आहे. या थंडीच्या दिवसांत कधी तिखट, तर कधी गोड चविष्ट मिठाई खाण्याची इच्छा होते. प्रत्येक जेवणानंतर गोड खावेसे वाटते. या काळात शरीर उबदार ठेवण्यासाठी मेथी, तिळाचे गोड लाडू, चिक्की, असे पदार्थ बनवले जातात; जे तुम्ही आवडीने खातही असाल. पण तुम्ही काजू, बदाम, गूळ असे विविध पदार्थ वापरून बनवलेला मसाला गूळ हा गोड पदार्थ खाल्ला आहे का? नावावरून हा जरी एक तिखट, झणझणीत पदार्थ वाटत असला तरी तो एक मिठाईचा प्रकार आहे; जो स्पेशल हिवाळ्यात बनवला जातो. त्यामुळे आज आपण मिठाईतील मसाला गूळ पदार्थ नेमका कसा बनवायता याची रेसिपी जाणून घेणार आहोत. चवीला किंचित तिखट, गोड असणारी ही मिठाई शरीरासाठी तितकीच हेल्दी असते. त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून ही रेसिपी करा.
साहित्य –
किसलेला गूळ – २ वाट्या
बारीक चिरलेले बदाम – अर्धी वाटी
बारीक चिरलेले काजू – ¼ कप
खरबूज बिया -२ टेस्पून
सुंठ पावडर – १.५ टीस्पून
वेलची पावडर – १ टीस्पून
बडीशेप – २ टीस्पून
खसखस – २ टेस्पून
ठेचलेली काळी मिरी – १/२ टीस्पून
तूप – २ चमचे
कृती –
सर्वप्रथम एका कढईत एक टेबलस्पून तूप गरम करा. आता त्यात बारीक चिरलेले काजू, बदाम, खरबूज आणि खसखस घालून हलके भाजून घ्या.
आता भाजलेले ड्रायफ्रुट्स कढईतून एका प्लेटमध्ये काढा.
आता कढईतील उरलेल्या तुपात आणखी थोडे तूप टाकून गरम करा, त्यानंतर त्यात किसलेला गूळ, सुंठ व वेलची पूड, ठेचलेली काळी मिरी आणि ठेचलेली बडीशेप घालून मिक्स करा.
गूळ पूर्णपणे वितळल्यावर आणि त्यात टाकलेले पदार्थ चांगले त्यात मिक्स झाल्यानंतर त्यात भाजलेले ड्रायफ्रूट्स घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा.
आता बेकिंग डिश किंवा खोलगट प्लेट तुपाने ग्रीस करा आणि त्यात गूळ व ड्रायफ्रूट्सचे तयार मिश्रण ओता. ओतलेले मिश्रण पूर्ण सेट झाल्यावर ते तुम्ही हव्या त्या आकारात कापून घ्या.