How to make thandai at home for holi 2025 होळीमध्ये जसा पुरणपोळीचा मान मोठा असतो त्याचप्रमाणे धुळवड खेळताना थंडाईचा आस्वाद घेत रंगाची उधळण करणं सर्वांनाच आवडतं. होळीच्या दिवशी बाजारात मिठाईच्या दुकानात स्पेशल थंडाई विकत मिळतेच मात्र विकतच्या पदार्थांमध्ये भेसळ असते हे आपण जाणतोच. त्यामुळे आरोग्यच्या दृष्टीने हे हानिकारक आहे. थंडाई तयार करताना आपण त्यात जे काही पदार्थ घालतो त्यामुळे शरीराचं वाढत्या उष्णतेपासून संरक्षण होतं आणि शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यासाठी मदत होते त्यामुळे आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत थंडाई कशी बनवायची याची सोप्पी रेसिपी जाणून घेऊया.
‘थंडाई’ साहित्य –
- टरबूजाच्या बिया, काजू, बदाम, पिस्ता,
- खसखस, वेलची [सगळे जिन्नस १ वाटी]. ८-९ काळी मिरी
- १ दालचिनी, १ वाटी साखर, गुलाबाच्या पाकळ्या [कोरड्या]
- केशर, दूध
- खायचा रंग [इच्छेनुसार]
‘थंडाई’ कृती –
- काजू, बदाम, पिस्ता, टरबूजाच्या बिया आणि खसखस हे काही वेळासाठी किंवा रात्रभर भिजवून ठेवावे.
- सर्वप्रथम भिजवलेले एक वाटी काजू, १ वाटी बदाम, १ वाटी पिस्ता, १ वाटी टरबूजाच्या बिया आणि १ वाटी खसखस मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
- आता या वाटलेल्या मिश्रणात एक वाटी दूध घालून, पुन्हा काजू-बदामाचे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून, त्याची चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यावी.
- आता दुसऱ्या कोरड्या मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच वेलची, आठ-नऊ काळी मिरी, एक दालचिनी आणि लहान चमचा वाळवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या असे सर्व पदार्थ घालून त्यांची बारीक पावडर करून घ्यावी.
- गॅसवर एक पातेले मध्यम आचेवर ठेवा. त्यामध्ये म्हशीचे साधारण अर्धा लिटर दूध तापवण्यासाठी ठेवून द्यावे. दूध पूर्णपणे उकळल्यानंतर एका डावाच्या मदतीने मंद आचेवर ते ढवळत राहावे.
- आता यामध्ये एक लहान चमचा केशर, गुलाबाच्या पाकळ्यांची तयार केलेली कोरडी पावडर आणि काजूची तयार केलेली ओली पेस्ट घाला. सर्व पदार्थ घालून झाल्यावर दूध पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- आता या दुधात एक वाटी साखर घालून सर्व मिश्रण साखर विरघळेपर्यंत ढवळत राहावे. तुम्हाला हवा असल्यास, एक छोटा चमचा खायचा पिवळा रंग, तयार होत असलेल्या थंडाईमध्ये घालून, दुधाला एक शेवटची उकळी आणावी.
- दुधाला उकळी आल्यानंतर पातेल्याखालील गॅस बंद करावा. आता हे थंडाई साधारण ३० ते ४० मिनिटांसाठी फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवून द्या.
हेही वाचा >> Holi Special Recipe: यंदाच्या होळीसाठी तयार करा खास, टेस्टी “कलरफूल दहीवडे”; ही घ्या सोपी रेसिपी
- थंड झालेली थंडाई ग्लासमध्ये ओतून, त्यावर पिस्त्याची भरभरीत पावडर आणि गुलाबाच्या कोरड्या पाकळ्यांनी सजावट करावी. टीप- दुधाचे प्रमाण हे अंदाजे सांगितलेले आहे. तुम्हाला हवे तसे दुधाचे प्रमाण वाढवून घ्यावे.