पाणीपुरी म्हंटल की, अगदी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. महिला वर्गाचा तर हा अगदी आवडता खाद्यपदार्थ आहे. लहान मुली, तरुणी, स्त्रिया अगदी कधीही आणि कुठेही पाणीपुरी खाण्यासाठी तयार होतात. तर आज सोशल मीडियावर एका युजरने एक अनोखी पाणीपुरी दाखवली आहे ; जी खूपच टेस्टी आहे. या व्हायरल व्हिडीओत तरुणाने बटाट्यापासून पुरी तर डाळिंबापासून पाणी बनवलं आहे. चला तर पाहुयात या पदार्थाची रेसिपी.
बटाट्यापासून पुऱ्या कशा बनवायच्या?
दोन चिप्स बनवण्यासाठीचे बटाटे सोलून घ्या.
किसणीच्या मदतीने बटाटयाच्या अगदी बारीक स्लाईजचे तुकडे करून घ्या.
त्यानंतर या स्लाईजवर बटाटाचे स्टार्च ब्रशने लावून घ्या.
त्यानंतर त्यावर दुसरा स्लाईज चिटकवून घ्या व त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या.
चौकोनी तुकडे मध्यम आचेवर गरम तेलात तळून घ्या.
त्यानंतर पुन्हा जास्त गरम तेलात पुऱ्या काळजीपूर्वक, कुरकुरीत तळून घ्या.
हेही वाचा …१५ मिनिटांत कपभर गूळ, शेंगदाण्याचा बनवा पौष्टीक लाडू; मोजकं साहित्य अन् कृती लिहून घ्या
व्हिडीओ नक्की बघा…
बटाटाचे स्टार्च कसे बनवायचे ?
बटाटे स्वच्छ धुवून सोलून बारीक किसणीवर किसून घ्या व एका मोठ्या भांड्यात पाण्यात ठेवा. पाच तासांनी भांड्यात सर्व बटाट्याचा किस हाताने चांगला चोळून हे पाणी दुसर्या स्वच्छ भांड्यात गाळून घ्या. गाळून उरलेल्या किसात पुन्हा पाणी घालून किस चोळून घेऊन ते पाणी पण गाळून घ्यावे. असे दोन भांड्यात गाळलेले जमा पाणी रात्र भर तसेच ठेवावे. सकाळी सगळा बटाट्याचा चिक म्हणजेच स्टार्च तळाशी साठलेला असेल.अलगद वरचे पाणी ओतून टाक. चिक खाली जमा झालेला दिसेल. तसे थोडे तास वार्यावर कोरडे होऊ द्यावे व नंतर एक दोन दिवस उन्हात वाळवाव. छान कोरडा झाला की, चाळून बरणीत भरून ठेवावा.
डाळींबाचे पाणी कसं बनवाल ?
दोन कप सोललेली डाळिंब, मूठभर ताजी कोथिंबीर, पुदिना, बीट १/४ तुकडे, सोललेली १ हिरवी मिरची, १/२ कप कैरी, १/२ इंच आलं,
१ कप पाणी, १/४ कप साखर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
त्यानंतर एका भांड्यात मिश्रण गाळणीने गाळून घ्या.
त्यानंतर या मिश्रणात बर्फाचे तुकडे, १/४ चमचा काळे मीठ, १ चमचा जीरा पावडर, १ चमचा चाट मसाला पावडर, १/२ टीस्पून काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, बुंदी घालून चांगले मिसळा.
अशाप्रकारे तुमची बटाट्याची पुरी आणि डाळिंबाचे पाणी तयार. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @saranshgoila या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे ; ज्यात ही हटके पाणीपुरी दाखवण्यात आली आहे.