Mix Fruit Jam Recipe : बऱ्याचदा मुले शाळेच्या डब्यात दिलेली भाजी-चपाती खाण्याचा कंटाळा करतात. अशा वेळी ते डबा तसाच परत घरी घेऊन येतात. पण, भाजी-चपातीऐवजी रोल, सँडचिव असे काही चमचमीत पदार्थ दिले, तर ते मुले आवडीने खातात. पण, हे पदार्थ सकाळी शाळेत जाण्याच्या वेळेत बनवणे अनेकदा शक्य होत नाही. अशा वेळी त्यांना नेमके काय द्यायचे, असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो. दरम्यान, लहान मुले जाम आणि ब्रेड आवडीने घातात.

त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी ब्रेड आणि जाम एक चांगला पर्याय असतो. परंतु, बाजारातील जाममध्ये अनेकदा प्रिझर्वेटिव्ह्ज असतात. त्यामुळे बाजारातील जाम आरोग्यास हानिकारक ठरू शकतो. अशा वेळी तुम्ही मुलांसाठी घरच्या घरी अगदी १५ मिनिटांत मिक्स फ्रूट जाम बनवू शकता. चला, तर जाणून घेऊ रेसिपी…

शेफ पंकज भदौरिया यांनी घरच्या घरी ‘मिक्स फ्रूट जाम’ बनवण्याची रेसिपी शेअर केली आहे ती आपण जाणून घेऊ…

मिक्स फ्रूट जाम बनविण्याची रेसिपी (Home Made Mix Fruit Jam Recipe In Marathi)

१) सर्वप्रथम पपई, चिकू, संत्री, सफरचंद, केळी अशी तुमच्या आवडीची फळे घ्या.

२) ही फळे व्यवस्थित धुवा, नीट पुसा व सोलून घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्या.

३) त्यानंतर गॅसच्या मध्यम आचेवर पॅन गरम करा. त्यात थोडं पाणी घ्या आणि सर्व चिरलेली फळे त्यात मिक्स करा. फळांचे लहान तुकडे करण्याची गरज नाही. तुम्ही मध्यम आकाराचे तुकडे करूनही शिजवू शकता.

४) पॅनवर झाकण ठेवून, मंद आचेवर फळे मऊ होईपर्यंत शिजवा. फळे मऊ झाल्यावर गॅस बंद करा आणि ती थंड होऊ द्या.

५) थंड केलेली फळे ब्लेंडर वापरून ब्लेंड करा. ही प्युरी गाळून घ्या. प्युरी गाळल्यानंतर सुमारे दोन ते अडीच कप लगदा बाहेर पडेल.

६) आता पुन्हा पॅन गरम करा आणि त्यात प्युरी मंद आचेवर शिजवा. यावेळी प्युरीइतकीच साखर त्यात मिक्स करा. त्यानंतर लिंबाचा रस घाला आणि तो चांगला मिसळा. मग गॅस कमी करा.

७) आता पॅनमध्ये सायट्रिक अॅसिड, मिक्स्ड फ्रूट एसेन्स व रास्पबेरी रेड फूड कलर मिक्स करा. ही प्युरी त्यात चांगली मिसळा आणि मंद आचेवर ७-८ मिनिटे थोडे घट्ट होईपर्यंत शिजवा.

८) प्युरी जामसारखी घट्ट झाली की नाही हे पाहण्यासाठी एका स्पॅटुलावर टाका आणि पाहा. जर जाम पडायला वेळ लागला, तर जाम जवळजवळ तयार झाला आहे, असे समजा.

९) त्यानंतर गॅस बंद करा आणि एक चमचा सोडियम बेंझोएट गरम पाण्यात विरघळवा आणि ते द्रावण तयार केलेल्या जाममध्ये चांगल्या प्रकारे मिसळा.

१०) अशा प्रकारे तुमचा मिक्स फ्रूट जाम खाण्यासाठी तयार आहे. त्यासाठी तो एका बरणीत भरा आणि तो दोन-तीन तास ​​थंड होऊ द्या. हा जाम तुम्ही ब्रेड किंवा पोळीला लावून खाऊ शकता. त्यानंतर ती बरणी फ्रिजमध्ये ठेवा.