बहुतांश तरुणमंडळी हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या खाण्याचा कंटाळा करतात. पण, आपल्या आहारामध्ये पालेभाज्या तसंच फळभाज्यांचा समावेश असावा, कारण या तुमच्या शरीराला थंड ठेवतात. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पालक, मेथी, शेपू , लालमाठ इत्यादी पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. म्हणून पालेभाज्या खा असे मुलांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले जात असते.भाजी खरेदीसाठी जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता तेव्हा असंख्य प्रकारच्या पालेभाज्या तुम्हाला बाजारात दिसतात. तर आज आपण त्यातील एक म्हणजे लालमाठची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. लालमाठाची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या…
साहित्य –
१. एक लालमाठची जुडी
२. लसूण – चार पाकळ्या
३. मिरची – चार मिरची (आवडीनुसार) किंवा लाल तिखट
४. कांदा – एक किंवा दोन
५. बारीक किसलेलं ओलं खोबर
६. आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट देखील टाकू शकता.
७. मीठ
हेही वाचा…नावडतीची भाजी होईल आवडती; पौष्टीक लालचुटुक बीटाची करा भाजी; लहान मुलंही चाटून पुसून खातील
कृती –
१. मार्केटमधून एक लालमाठची जुडी आणा.
२. सगळ्यात पहिला जुडी निवडून घ्या.
३. त्यानंतर स्वछ पाण्याने धुवून घ्या आणि मग बारीक चिरून घ्या.
४. मिरची, एक कांदा बारीक चिरून घ्या.
५. गॅसवर कढईत ठेवा व त्यात तेल घाला.
६. मग त्यात लसूण घाला. नंतर तेलात मिरची टाका. थोड्या वेळाने कांदा घाला. (मिरची टाकायची नसल्यास तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता).
७. नंतर चिरून घेतलेली भाजी त्यात घाला.
८. त्यानंतर भाजीत मीठ शिवरुन घ्या.
९. नंतर वाफेवर भाजी थोडावेळ शिजवून घ्या.
१०. शिजल्यानंतर भाजीत बारीक किसलेलं ओलं खोबर घाला.
११. अशाप्रकारे तुमची लालमाठची भाजी तयार.
लालमाठची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे –
लालमठच्या भाजीत भरपूर फायबर, व्हिटॅमिन ए, सी, के आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. डिहायड्रेशनची समस्या तसेच केस आणि डोळ्यांच्या समस्येसाठी ही भाजी उत्तम ठरते. त्यामुळे लालमाठची भाजी पोळी किंवा भाकरीबरोबर खाणे उत्तम आहार ठरते. पचनाच्या समस्येसाठी सुद्धा ही भाजी गुणकारी असते. त्यामुळे आपल्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करायला विसरू नका.