Mango Pickle Burshi : उन्हाळा सुरु झाला की गृहिणींची उन्हाळ्यातील वाळवणे, पापड, कुरडई, लोणचे करण्यासाठी लगबग सुरु होते. महिला वर्षभर पुरेल इतकं लोणंच महिला उन्हाळ्यातच करून ठेवतात. कैरीचे लोणचे असो, मिरची लोणचे, लिंबाचे लोणचे असो व आवळ्याचे लोणचे महिला या काळात आवर्जून बनवतात. लोणचे तसे करायला तसे खूप सोपे आहे, पण अनेकदा लोणचं केल्यानंतर त्याला खराब वास येतो किंवा बुरशी लागते. काही वेळा लोणच्याच्या फोडी मऊ होतात ज्यामुळे ते चवीला चांगले लागत नाही.
कोणत्याही प्रकारचे लोणचे करताना महिला घरगुती पद्धतीने लोणच्याचा मसाला तयार करू शकतात ते अगदी सोपे आहे, पण लोणचे करताना काही नकळत होणाऱ्या चुका मात्र लोणचे खराब व्हायला कारणीभूत ठरतात. म्हणूनच आज आपण अगदी लोणच्या बुरशी लागू नये म्हणून छोट्या छोट्या टिप्स सहित, वर्षानुवर्षे टिकणारे, २-३ वर्षे टिकणारे करायचे लोणचे कसे करायचे हे समजून घेऊ या.
कैरीचे लोणचे
साहित्य
कैरी मुरवण्यासाठी
- लोणच्याच्या कैऱ्या ३ किलो
- हळद ३ चमचे
- मीठ ३ चमचे
मसाला करण्यासाठी
- मेथी दाना ३ चमचे
- लवंग १० – १२
- मिरे १० – १२
- दालचिनी ३-४ इंच
- हिंग ३ चमचे(२० ग्रॅम)
- बेडगी मिरची पावडर ७५ ग्रॅम
- तिखट मिरची पावडर ७५ ग्रॅम
- मीठ १०० ग्रॅम
- मोहरीची डाळ ३००-३५० ग्रॅम
- तेल ४०० – ५०० ग्रॅम
कैरीचे लोणचे कसे बनवायचे?
कैरीचा चिक कसा काढावा?
- कैरीला रात्रभर किंवा किमान ७-८ तास साध्या पाण्यात भिजवा
- नंतर कैरीचा चिक काढून टाकण्यासाठी कैरी आणखी एका पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर स्वच्छ सुती कापडाने कैरी चांगली पुसून घ्या.
- कैरीचे तुकडे करा, कैरीची कोय बाजूला काढा
- नंतर स्वच्छ आणि कोरड्या सुती कापडाने कैरीचे तुकडे पुसून घ्या.
- कैरीचे तुकडे करून घ्या. अडकित्ता वापरून कैऱ्या फोडू शकता. मध्यम आकाराच्या फोडी करा. फार बारीक नको आणि फार मोठ्या नको,
- आता कैरी फोडल्यानंतर त्यातील कोयचे तुकडे बाजूला काढून टाका.
- पुन्हा सर्व फोडी स्वच्छ कापडाने पुसुन घ्या. कैरी फोडताना लागलेली बी स्वच्छ कर.
- एका मोठ्या भांड्यात कैरीच्या फोडी घ्या, त्यात मीठ आणि हळद घालून सर्वकाही चांगले मिसळा, झाकून ठेवा आणि ७-८ तास बाजूला ठेवा. ७-८ तासांनंतर त्यातील पाणी काढून टाका जेणेकरून जास्तीचे पाणी निघून जाईल.
- आता ते स्वच्छ आणि कोरड्या कापडावर तुकडे पसरवून रात्रभर वाळवा किंवा तुम्ही २-३ तास उन्हात वाळवू शकता.
- आता कैरीचे तुकडे लोणचे बनवण्यासाठी तयार आहेत.
लोणच्याचा मसालाची कृती कशी बनवायची?
- कैरी सुकवायला ठेवल्यावर त्याच वेळी लोणच्याच्या मसाला मिश्रण बनवायला सुरुवात करा.
- एका जाड तळाचा पॅन गरम करा, त्यात मेथीचे दाणे, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी काही वेळ भाजून घ्या. थंड होऊ द्या आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर त्याच पॅनमध्ये ७५% मोहरीची डाळ भाजून वाटून घ्या.
- आता मध्यम आचेवर लाकडी घाण्याचे तेल गरम करा आणि गॅस बंद करा. थंड झाले तीक त्यात ५-६ मिनिटांनी हिंग घाला आणि एकत्र करा. दालचिनी, लवंगा आणि काळी मिरीचा मसाला घाला आणि एकत्र करा. नंतर त्यात बारीक केलेली मोहरीची डाळ घाला आणि चांगले एकत्र करा. शेवटी लाल तिखट आणि मीठ घाला आणि सर्वकाही चांगले एकत्र करा आणि हा मसाला पूर्ण थंड होऊ द्या.
- दुसऱ्या दिवशी लोणच्या मसाल्याचे मिश्रण आता खोलीच्या तापमानावर येईल आणि कैरीचे तुकडे पूर्णपणे सुकले आहेत.
- कैरीचे तुकडे एका मोठ्या भांड्यात घ्या, त्यात थंड झालेले मसाल्याचे मिश्रण घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा.
- स्वच्छ आणि कोरड्या सुती कापडाने झाकून ठेवा आणि ते ९-१० तास तसेच राहू द्या.
- दुसऱ्या दिवशी, लोणचे तपासा, जर ते कोरडे वाटत असेल किंवा तेल कमी असेल तर तुम्ही त्यात अधिक तेल घालू शकता.
- त्यासाठी, २०० ग्रॅम तेल गरम करा, नंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्या.
ते थंड झाल्यावर, ते लोणच्यात घाला. तेलाची पातळी लोणच्याच्या बरणीच्या किमान १ सेमी वर राहील याची खात्री करा. - लोणचे साठवण्यासाठी तयार आहे, ते कोरड्या आणि स्वच्छ काचेच्या भांड्यात ठेवा.
लोणचे खराब होऊ नये टिप्स
- लोणच्याची कैरी ही मे-जूनमध्ये बाजारात मिळायला सुरुवात होते. मार्च-एप्रिलमध्ये लोणच्याची कैरी मिळत नाही.
- लोणच्याची कैरीमध्ये दोन-तीन कैऱ्या वापरल्या जातात. एक राजापुरी कैरी, एक रायवळ जातीची कैरी किंवा गावठी कैरी देखील वापरतात.
- लोणच्याची कैरी निवडताना ती कडक झालेली असावी. कैरीतील कोय कडक झालेली असावी, मऊ नसावी. कोय मऊ असेल तर लोणचे खराब होऊ शकते.
- जर कोवळी कैरी किंवा पिकलेली कैरी, मऊ पडलेली कैरी घेतली तर त्यात आद्रता किंवा ओलावा जास्त असतो त्यामुळे अशी कैरी वापरली तर लोणचे खराब होऊ शकते. कैरीला बुरशी लागू शकते.
- कैरीचे लोणचे करण्यापू्र्वी त्याचा चिक काढून घ्या.
- कैरी स्वच्छ धुवून आणि पुसून मगच लोणच्यासाठी वापरा.
- कैरीसाठी वापरणाऱ्या कोणत्याही भांड्याला जराही पाणी असून नये. स्वच्छ पुसून भांडी वापरा. हवे असल्यात उन्हात वाळल्यानंतर भांडी वापरा.
- कैरीचा मसाला तेलात टाकल्यानंतर तो पूर्ण थंड झाल्यावर मगच कैरीमध्ये टाकावा. कैरीचा मसाला गरम असतानाच टाकला तर कैरी मऊ पडू शकते आणि लोणचे खराब होऊ शकते.
- कोणतेही लोणचे टिकण्यासाठी लोणच्या वर तेलाचा थर असणे आवश्यक आहे. जेणेकरून हवेतील ओलव्यापासून रक्षण करते आणि बुरशी लागत नाही.
- कधीही लोणच्यासाठी धातूचा डब्बा वापरू नका कारण त्यात भरपूर मीठ वापरलेले असते ज्यामुळे डब्याला छिद्र पडु शकते आणि लोणचे खराब होऊ शकते.
- प्लॉस्टिकच्या डब्यात लोणचे ठेवलेले चालत असले तरी ठेवू नका कारण त्यामुळे लोणच्याचा रंग आणि चव बदलते.
- लोणचे नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणी वापरू शकता. चिनी मातीची बरणी चांगली असेल तरच वापरा.
- बरणीमध्ये लोणचे भरण्यापूर्वी स्वच्छ धूवायचे आणि पुसुन घ्या. २ तास उन्हामध्ये किंवा ७-८ तास फॅन खाली चांगल्या सुकवून घ्या जेणकरून त्यातील ओलावा निघून जाईल. बरणीमध्ये लोणचे टाकल्यानंतर त्यात वर थोडे तेल टाका.